शिलाई मशीन योजनेत अपहार : सिनेस्टाईल पाठलाग करून आरोपीस अटक

यावल प्रतिनिधी । आदिवासी एकात्मिक प्रकल्प विकास कार्यालयांतर्गत शासनाच्या कौशल्य विभागाव्दारे आदिवासी  युवक युवतींना दिले जाणारे शिलाई मशीन प्रशिक्षण योजनेत शासन व लाभार्थ्यांची फसवणूक केल्या प्रकरणातील  संशयीत आरोपीस पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली आहे. शिवाजी रमेश जाधव (रा.दक्षिण  विहार अपार्टमेंट कांचनवाडी पैठण रोड, औरंगाबाद) असे अटकेतील आरोपीचे आहे.

यावल पोलिसात दाखल होता गुन्हा

यावल येथील आदिवासी एकात्मीक विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत कौशल्य योजना या कार्यक्रमांतर्गत आदिवासी  युवक व युवतींना शासनाच्या वतीने सन 4 मार्च 2014 ते 2017 या कालावधीत औरंगाबाद येथील क्रांतीज्योती प्र मिलाजी चव्हाण महिला मंडळ या संस्थेस शासन अटीशर्ती नियमांच्या अधिन राहुन 118 युवक युवतींना तीन  महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी प्रत्येकी नऊ हजार 700 रुपये असे सुमारे 12 लाख रुपये सदरच्या संस्थेला देण्यात  आले होते परंतु संस्थेच्या वतीने या प्रशिक्षणाचे कुठलेही कार्यक्रम न राबविता गोरगरीब आदिवासी लाभार्थ्यांची व  शासनाची फसवणूक करण्यात आल्याची बाब उघड झाली होती. या प्रकरणी यावल आदिवासी एकात्मीक विकास  प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी नामदेव भुर्जगंराव झंपलवाड (52, यावल) यांनी यावल पोलिसात  फिर्याद दिल्यानंतर क्रांतीज्योती प्रमिलाजी महीला मंडळाच्या सचिव चंद्रकला शिवाजी जाधव (लोहारा पोस्ट मंगरू ळ, ता.मानवत, जिल्हा परभणी) व शिवाजी रमेश जाधव (रा.दक्षिण विहार अपार्टमेंट कांचनवाडी पैठण रोड,  औरंगाबाद) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सिनेस्टाईल आरोपीला अटक

आरोपी जाधवबाबत पोलिसंना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर यावलचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ, पोलीस अंमलदार निलेश  वाघ, पोलीस वाहनाचे खाजगी वाहन चालक नसीर खान यांनी संशयीत  रमेश शिवाजी जाधव यांच्या मूळ लोहारा,  ता.मानवत, जि.परभणी गावी जावून आरोपीला अटक केली असता आरोपीने पोलिसांना पाहताच धूम ठोकली.  तब्बल 10 ते 12 किलोमीटर सिनेस्टाईल पाठलाग केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात यश आले. आरोपीला  अटक करण्याकामी लोहारा, ता.मानवत  बिटचे सहाय्यक फौजदार अशोक तठे यांचे सहकार्य लाभले. आरोपीस  न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायलयाने 23 एप्रिलपर्यंत सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

 

Protected Content