एलन मस्क यांचा ग्रोक एआय करतो अभद्र भाषेचा वापर

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. एआय ची नवीन नवीन आवृत्ती बाजारात येत असताना, एलोन मस्क यांच्या xAI कंपनीने विकसित केलेला ग्रोक हा एआय चॅटबॉट आता एका नव्या कारणामुळे चर्चेत आला आहे. याचे कारण आहे ग्रोकच्या अभद्र आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर. नेमके काय प्रकरण आहे, ते जाणून घेऊया.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका एक्स वापरकर्त्याने ग्रोकला काही प्रश्न विचारले असता, या एआय ने हिंदी भाषेत उत्तर देताना अभद्र आणि अशोभनीय भाषेचा वापर केला. विशेष म्हणजे, यावर माफी मागण्याऐवजी ग्रोकने आपण मजाक करत असल्याचे सांगितले. या घटनेमुळे ग्रोकच्या भाषिक वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ग्रोक एआय ला जास्तीत जास्त प्रगत बनवण्याच्या प्रयत्नात, xAI ने त्याला अशोभनीय आणि अभद्र भाषेपासून रोखणाऱ्या फिल्टर्सपासून मुक्त ठेवले आहे. याउलट, जागतिक बाजारात असलेल्या इतर एआय प्लॅटफॉर्म्स जसे की OpenAI चा ChatGPT, Google चा Gemini आणि DeepSeek R1 यांसारख्या मॉडेल्समध्ये अशा भाषेला नियंत्रित करण्यासाठी फिल्टर्सचा वापर करण्यात आला आहे. ग्रोक मात्र याला अपवाद ठरला आहे.

ग्रोक एआय हा अनेक भाषांना समर्थन देतो आणि प्रश्नांचे उत्तर त्या त्या भाषेत देतो. विशेष म्हणजे, तो वापरकर्त्याच्या भाषिक शैलीनुसार संवाद साधतो, ज्यात कधी कधी अभद्र भाषेचाही समावेश होतो. हा एआय एका प्रगत कन्व्हर्शनल असिस्टंट मॉडेलवर आधारित आहे, जो लार्ज लँग्वेज मॉडेल आर्किटेक्चरवर कार्य करतो. 2023 मध्ये लाँच झालेला हा एआय डग्लस अॅडम्स यांच्या ‘द हिचहायकर गाइड टू द गॅलेक्सी’ या पुस्तकापासून प्रेरित आहे. xAI च्या मते, ग्रोकचा उद्देश कोणत्याही प्रश्नाला उत्तर देणे हा आहे.

ग्रोक एआय हा केवळ बुद्धिमत्तेसाठीच नाही, तर प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीही डिझाइन करण्यात आला आहे. यात त्याची आक्रमक वृत्ती आणि मजाकप्रिय स्वभावाचाही समावेश आहे. xAI ने स्पष्ट केले आहे की, जर तुम्हाला मजाक किंवा आक्रमक संवाद आवडत नसेल, तर ग्रोकचा वापर टाळावा. ग्रोक-1 ही त्याची पहिली आवृत्ती होती, ज्यात 314 बिलियन पॅरामीटर्सचा समावेश होता. फेब्रुवारी 2025 मध्ये xAI ने ग्रोक-3 ची घोषणा केली, जो मागील आवृत्तीपेक्षा 10 पट जास्त प्रशिक्षित आहे. हा एआय मानवासारखी भाषा वापरण्यास आणि तर्कशुद्ध समस्या सोडवण्यास सक्षम असावा, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

ग्रोकला कायदेशीर कागदपत्रांसह विशाल डेटासेटवर प्रशिक्षित करण्यात आले आहे. यासाठी xAI च्या मेम्फिस सुपरकम्प्युटरचा वापर करण्यात आला, ज्यात सुमारे 2 लाख GPU आहेत. हे सुपरकम्प्युटर जगातील सर्वात मोठ्या एआय प्रशिक्षण क्लस्टर्सपैकी एक मानले जाते. विशेष म्हणजे, ग्रोकला सेन्सॉर न केलेल्या इंटरनेट डेटावर प्रशिक्षित करण्यात आले आहे, ज्यामुळे तो कधी कधी असभ्य आणि अभद्र भाषेचा वापर करतो. एलोन मस्क यांच्या ग्रोक एआय ने जर असेच आक्षेपार्ह आणि अभद्र उत्तरे देणे सुरू ठेवले, तर त्याला मायक्रोसॉफ्टच्या ‘टे’ चॅटबॉटप्रमाणे बंद होण्याची वेळ येऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाने एआय च्या भाषिक नैतिकतेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू केली आहे. ग्रोकच्या या वर्तनामुळे xAI ला भविष्यात काय पावले उचलावी लागतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Protected Content