जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्तींचे जीवन प्रकाशमान करण्याच्या दृष्टीने ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजनें’तर्गत फक्त ५०० रुपयांत वीज जोडणीची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने घरगुती वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेत जळगाव परिमंडलातील ६३३ ग्राहकांना वीजजोडणी देण्यात आली आहे. ६ डिसेंबर २०२२ पर्यत या योजनेचा लाभ घेता येणार असून गरजू नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी केले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्तींचे जीवन प्रकाशमान करण्याच्या दृष्टीने वीज जोडणी कार्यक्रम १४ एप्रिल २०२१ पासून सुरू करण्यात आला आहे.. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेची प्राधान्याने अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेत आजपर्यंत खान्देशातील ६३३ अर्जदारांना वीजजोडणी देण्यात आलेली आहे. यात जळगाव जिल्ह्यात ३८७, धुळे जिल्ह्यात १३१ तर नंदुरबार जिल्ह्यात ११५ ग्राहकांना वीजजोडण्या देण्यात आलेल्या आहेत.
असा घेता येईल योजनेचा लाभ –
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अर्जदाराकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र, वीज जोडणीसाठी करण्यात येणाऱ्या विहित नमुन्यानुसार आवश्यक कागदपत्रे उदा.आधार कार्ड, रहिवासी दाखला इ. आवश्यक आहे. तसेच अर्जदारांनी वीजजोडणीसाठी अर्ज केल्याच्या ठिकाणी यापूर्वीची थकबाकी नसावी. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने महावितरणच्या विहित नमुन्यात कागदपत्रासह ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. शासनमान्य विद्युत कंत्राटदारांकडून वीज मांडणीचा चाचणी अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.
लाभार्थ्यास ५०० रुपये इतकी अनामत रक्कम महावितरणकडे एक रकमी जमा करण्याचा अथवा सदर रक्कम ५ समान मासिक हफ्त्यांमध्ये वीजबिलाद्वारे भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे. अर्जदाराचा परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या तरतुदीच्या अधीन राहून वीजजोडणी उपलब्ध करण्यात येईल. महावितरणद्वारे प्राप्त अर्जानुसार ज्या अर्जदाराच्या घरी वीज जोडणी नाही अशा लाभार्थ्यांना विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास पुढील १५ कार्यालयीन दिवसांत वीजजोडणी देण्यात येईल. अर्जदारास वीजजोडणीसाठी विद्युत पायाभूत सुविधा उपलब्ध करावी लागणार असल्यास महावितरणद्वारे स्वनिधी अथवा जिल्हा नियोजन विकास निधी अथवा इतर उपलब्ध होऊ शकणाऱ्या निधीमधून काम प्राधान्याने हाती घेऊन पूर्ण करण्यात येईल व वीजजोडणी देण्यात येईल.