परवाना नूतनीकरणासाठी लाच घेणारा विद्युत निरिक्षक गजाआड

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | परवाना नूतनीकरणासाठी १५ हजारांची लाच मागून स्वीकारणार्‍या विद्युत निरिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.

जिल्ह्यातील लाचखोरांच्या प्रमाणात वाढ होतांना दिसून येत आहे. या अनुषंगाने पुन्हा एकदा अधिकार्‍याला एसीबीच्या पथकाने ट्रॅप केले आहे. या संदर्भातील माहिती अशी की, यातील तक्रारदार हे कंत्राटदार असून ते शासनाचे इलेक्ट्रिकल कामे करीत असतात. त्यांच्याकडील परवानाचे नूतनीकरण करण्यासाठी तक्रारदार यांनी उद्योग उर्जा व कामगार खात्यात विद्युत निरिक्षक-वर्ग १ या पदावर कार्यरत असणारे गणेश नागो सुरळकर यांच्याकडे अर्ज केला होता.

दरम्यान, संबंधीत तक्रारदाराकडे गणेश सुरळकर यांनी १५ हजार रूपयांची मागणी केली होती. यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. या तक्रारीवरून एसीबीचे पथक तयार करण्यात आले. मंगळवारी पंचा समक्ष लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे उपअधिक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ दिनेशसिंग पाटील , स.फौ.सुरेश पाटील,पोकॉ प्रदिप पोळ, पोकॉ. राकेश दुसाने पो.कॉ,प्रणेश ठाकुर तसेच अमोल वालझाडे , पोलीस निरीक्षक , एन. एन. जाधव , पोलीस निरीक्षक ,, पो.ह.रविंद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनिल वानखेडे, बाळू मराठे व अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने केली आहे.या संदर्भात रात्री उशीरापर्यंत जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content