फैजपूर (प्रतिनिधी) येथील भुसावळ रोडवरील जुन्या बहिणाबाई शाळेजवळ विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने एक बैल जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी २,०० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत सुदैवाने बैल गाडीवर बसलेल्या तीन-चार मजुरांचे प्राण वाचले.
अधिक माहिती अशी की, येथे दुपारी हलक्या स्वरूपात पाऊस पडल्याने शेतात काम करणारे मजूर घराकडे निघाले होते. त्याचप्रमाणे जयंत दिनकर कोल्हे यांच्या मालकीची बैलगाडी शेतातून परतत असतांना जुन्या बहिणाबाई शाळेजवळील एका विजेच्या खांबात विद्युत प्रवाह उतरलेला होता. त्याच खांबाला बैलजोडीतील एका बैलाचा स्पर्श झाल्याने तो बैल जागीच ठार झाला. ही घटना घडताच गाडीवर बसलेल्या महिला मजुरासह चौघांनी पटापट उड्या घेतल्याने सुदैवाने थोडक्यात मनुष्य जीवितहानी टळली. या घटनेची माहिती मिळताच विद्युत मंडळाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन विद्युतप्रवाह बंद केला. तर या विद्युत प्रवाहमुळे ठार झालेल्या बैलाची किंमत सुमारे ६० हजार असल्याचे उपस्थितांमधून सांगण्यात आले. ऐन पेरणीच्या तोंडावर बैल मेल्याने कोल्हे कुटुंबांवर संकट कोसळले आहे. त्यांना विज मंडळाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.