यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपालिकेच्या सभागृहात उद्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेकडे शहरवासीयांचे लक्ष लागले असून, या सभेत महत्त्वाच्या विषय समितींच्या सभापतींची निवड होणार आहे. या निवडीनंतर नगरपालिकेतील विविध प्रलंबित कामे, नागरिकांच्या समस्या आणि विकासाशी संबंधित निर्णय मार्गी लागण्याची आशा व्यक्त केली जात आहे. राजकीय वर्तुळात सत्ताधारी गटातीलच तीन समित्यांचे सभापती निवडले जाण्याचे संकेत दिले जात आहेत.

दिनांक १९ जानेवारी रोजी होणाऱ्या या सर्वसाधारण सभेचे अध्यक्षस्थान पिठासीन अधिकारी तथा तहसीलदार मोहनमाला नाझिरकर भूषवणार आहेत. या सभेस मुख्याधिकारी निशीकांत गवई, सहमुख्याधिकारी रविकांत डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले आहे. यावल शहराच्या प्रथम नागरिक लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. छाया अतुल पाटील, उपनगराध्यक्ष सईदा बी. याकुब शेख तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांची उपस्थिती या सभेला लाभणार आहे.

नगरपालिकेच्या विषय समित्यांची रचना पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाला कामकाजाला अधिक वेग येणार आहे. स्थायी समितीच्या सभापतीपदी पदसिद्ध नगराध्यक्ष सौ. छाया अतुल पाटील असतील, तर उपनगराध्यक्ष सईदा बी. शेख या एका विषय समितीच्या सभापतीपदाची धुरा सांभाळतील, अशी चर्चा आहे. पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती, स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती, नियोजन व विकास समिती तसेच महिला व बालकल्याण समिती अशा एकूण पाच विषय समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे.
या समित्यांचे सभापती आपल्या-आपल्या विभागामार्फत शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, विकासकामे आणि सामाजिक प्रश्नांवर निर्णय घेतील. गेल्या काही काळापासून रखडलेली विकासकामे, नागरिकांच्या तक्रारी आणि मूलभूत सुविधांशी संबंधित समस्या आता मार्गी लागतील, अशी अपेक्षा यावल शहरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडीनंतर नगरपालिकेच्या कामकाजात सुसूत्रता आणि गतिमानता येईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.



