नवी दिल्ली (वृत्तसेवा ) लोकसभा निवडणुकीचं सहाव्या टप्प्यातील मतदान उद्या (रविवार) होणार आहे. या टप्प्यात ५९ जागांसाठी मतकौल दिला जाणार असून ९७९ उमेदवारांचे भवितव्य ठरवणारा हा टप्पा आहे. दरम्यान, या टप्प्यात भोपाळमध्ये मतदान होत असून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध भाजपने मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूरला उमेदवारी दिल्याने त्या लढतीकडे देशाचे लक्ष लागलेले आहे.
येथे होईल मतदान
उत्तर प्रदेशातील १४, मध्य प्रदेशातील ८, बिहारमधील ८, पश्चिम बंगालमधील ८, हरयाणातील सर्व १० आणि दिल्लीतील सर्व ७ जागांवर उद्या मतदान होणार आहे. भाजपसाठी हा टप्पा महत्त्वाचा आहे. २०१४च्या निवडणुकीत भाजपने या ५९ जागांवर ३५.८ टक्के मते मिळवत ४४ जागा जिंकल्या होत्या. या जागा राखण्याचे आव्हान भाजपपुढे असणार आहे.
हे आहेत प्रमुख उमेदवार
सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव, केंद्रीय मंत्री मनेका गांधी, हर्षवर्धन, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर, बॉक्सर विजेंदर सिंग, केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह, नरेंद्रसिंह तोमर, रवी शंकर प्रसाद, रामकृपाल यादव, अश्विनीकुमार चौबे, राजकुमार सिंह, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह, ज्योतिरादित्य शिंदे या टप्प्यातील प्रमुख उमेदवार आहेत.