जळगाव प्रतिनिधी । महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदांसाठी उद्या १८ मार्च रोजी घेण्यात येणारी निवड प्रक्रिया ऑफलाईन होण्यासाठी दोन नगरसेवकांनी दाखल केलेली याचिका खंडपीठाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता महापौर आणि उपमहापौर यांची निवड प्रक्रिया ऑनलाईनच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवड १८ मार्च रोजी होत असून याआधीच भाजपमध्ये फूट पडलेली आहे. दरम्यान, ही निवड प्रक्रिया ऑनलाईन या प्रकारात होत असल्याने भाजपने याला विरोध दर्शविला होता. या अनुषंगाने डॉ. विरन सुरेश खडके व रंजना विजय सोनार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते.
पिंपरी चिंचवड आणि नागपूर महापालिकेत ऑफलाईन बैठक घेवून महापौर आणि उपमहापौर निवडणूक घेण्यात आली होती. त्याच पध्दतीने जळगाव महानगरपालिकेची निवडणूक ऑनलाईन नव्हे तर ऑफलाईन या प्रकारात घेण्यात यावी अशी मागणी, या याचिकेत करण्यात आली होती.
खंडपीठाचे न्यायमुर्ती संजय गंगापूरवाला आणि श्रीकांत कुळकर्णी यांनी डॉ. विरन सुरेश खडके व रंजना विजय सोनार यांनी दाखल केलेली याची फेटाळून लावली असून महापौर आणि उपमहापौर निवड प्रक्रिया ही ऑनलाईन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.