नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पिपाणी चिन्हामुळे लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला फटका बसला होता. पिपाणी आणि तुतारी चिन्हातील साम्यामुळे शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या मतदानावर परिणाम झाला होता. विधानसभा निवडणुकीत याचा पुन्हा फटका बसू नये यासाठी शरद पवार गटाने पिपाणी चिन्ही गोठवण्याची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र निवडणूक आयोगाने शरद पवार गटाची ही मागणी फेटाळली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमारांनी सांगिले की, शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे दोन मागण्या केल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह देण्यात आले होते. मात्र शरद पवार गटाची तक्रार होती की, हे चिन्ह मतपत्रिकेवर छोटे दिसते. याची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. तुतारी चिन्ह त्यांनी केलेल्या सूचनेनुसार आता दिसेल. त्यांनी सांगितलेला आकार आम्ही मान्य केला आहे. तर पिपाणी चिन्ह गोठवण्याची दुसरी मागणी शरद पवार गटाने केली होती. बॅलेट युनिटमधील पिपाणी चिन्ह आणि तुतारी वाजवणारा माणूस या दोन्ही चिन्हात फरक आहे, असे म्हणत राजीव कुमार यांनी पिपाणी चिन्ह गोठवण्याची शरद पवार गटाची मागणी फेटाळली आहे.