जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मुंबईतील कुलाबा पोलीस स्टेशनचे अधिकारी बोलत असल्याचे भासवून एका अज्ञात व्यक्तीने भुसावळ येथील एका ८६ वर्षीय सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ८० लाख ५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुरुवारी ११ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता सायबर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या फसवणुकीचे बळी ठरलेले नागरिक हे भुसावळ येथील सुकदेव पांडुरंग चौधरी (वय ८६) असून, ते एमएसईबी येथून सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. ही घटना २८ ऑक्टोबर ते ५ डिसेंबर या दरम्यान ऑनलाईन माध्यमातून वेळोवेळी घडली.

फिर्यादी सुकदेव चौधरी यांच्या मोबाईल क्रमांकावर संशयित आरोपीने वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून वारंवार व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधला. आरोपींनी स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे भासवले. आरोपींनी सुकदेव चौधरी यांना, त्यांच्यावर मुंबईतील कुलाबा पोलीस स्टेशन येथे मनी लाँडरिंग आणि अतिरेकी यांच्याकडून पैसे घेतल्याप्रकरणी गुन्हे दाखल असल्याचे खोटे सांगितले.
गुन्हा दाखल झाल्याचे भासवण्यासाठी आरोपींनी खोटे कागदपत्रे आणि इतर आरोपींचे फोटो चौधरी यांना व्हॉट्सॲपवर पाठवले. या गुन्ह्यात त्यांचा सहभाग असून, त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघाले असल्याचे खोटे सांगून त्यांना वारंवार धमकावण्यात आले आणि घाबरवले गेले.
या धमक्यांना घाबरून सुकदेव चौधरी यांनी संशयित आरोपींनी दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये आरटीजीएसद्वारे वेळोवेळी एकूण ८० लाख ५ हजार ४१६ रुपये एवढी मोठी रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करून फसवणूक केली.
याप्रकरणी सुकदेव चौधरी यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



