मुंबई (वृत्तसंस्था) भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे तिकीट चक्क कापले गेल्याचे वृत्त समोर आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. काही वृत्तवाहीन्यानी दिलेल्या वृत्तानुसार भाजपची दुसऱ्या यादीतही खडसे यांचे नाव नसून पक्षश्रेष्ठींनी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्याबाबत कळविले असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, खडसे आता नेमकी काय भूमिका घेतात? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
या संदर्भात अधिक असे की, भारतीय जनता पक्षाच्या १२५ उमेदवारांचा समावेश असणारी पहिली यादी नुकतीच जाहीर झाली आहे. यात माजी मंत्री तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांच्या नावाचा समावेश नसल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. परंतू त्यांचे नाव दुसर्या यादीत असेल, असे संकेत माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले होते. तर दुसरीकडे एकनाथराव खडसे यांनी आपली काय चूक आहे ? असा सवाल केला होता. तसेच त्यांच्या समर्थकांनीही ठिय्या आंदोलन केले होते. दरम्यान, आता खडसे यांचे तिकीट चक्क कापले गेले असल्याचे वृत्तसमोर आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली असून खडसे आता नेमकी काय भूमिका घेतात? याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.