मुक्ताईनगर प्रतिनिधी । भाजपचे नाराज नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे हे पक्षांतराच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू असतांना ते आज प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ऑनलाईन सहभागी झाल्याने पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, एकनाथराव खडसे हे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षावर व विशेष करून फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. यामुळे ते पक्षत्याग करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. यातच काही दिवसांपूर्वी त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची जोरदार चर्चा झाली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यासाठी यासाठी स्वतंत्र बैठक घेतल्याची माहिती देखील समोर आली आहे. तर यातच काल सोशल मीडियात व्हायरल झालेल्या क्लिपमधून खडसे यांनी पक्षत्याग करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमिवर, आज खडसे हे प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ऑनलाईन सहभागी झाल्याने जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.
खडसे यांनी काल कथित क्लिप व्हायरल झाल्यानंतरही आपला पक्षत्यागाचा विचार नसल्याचे सांगितले होते. यानंतर ते आज प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ऑनलाईन सहभागी झाल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे. या बैठकीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. यात खडसे यांचा सहभाग असल्याने त्यांनी आपण पक्षासोबतच असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.