जळगाव प्रतिनिधी ।शहरासह जिल्ह्यात उन्हाचा पारा ४४ अंशापर्यंत पोहचला आहे. मनुष्यांच्या अंगाची लाहीलाही होत असून पक्षांचा मृत्यू होत आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पक्षी वाचविणे आपली मुख्य जबाबदारी आहे. तरी प्रत्येकाने सत्कर्म करीत पक्षी वाचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी व्यक्त केले.
शहरातील एकता रिटेल किराणा मर्चंटस आणि महावीर पाठशाळेतर्फे ५० पर्यावरण प्रेमींना मोफत बर्ड बाथटब वाटप करण्यात आले. नवीपेठेतील एकता पतसंस्थेच्या प्रांगणात पार पडलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पारस टाटीया, मनोज गोविंदवार, दिलीप कुमट हे होते. यावेळी उज्ज्वला टाटीया व महावीर पाठशाळेच्या शिक्षिका भाग्यश्री कुमट यांचाही सन्मान करण्यात आला. पतसंस्थेचे अध्यक्ष ललीत बरडीया, उपाध्यक्ष घनश्यामदास अडवाणी, संचालक दयानंद कटारिया, गायत्री कुलकर्णी, सुधा भावसार, पतसंस्थेच्या सीईओ प्रणिता कोलते यांची मुख्य उपस्थिती होती.
प्रास्ताविकात पतसंस्थेचे अध्यक्ष ललीत बरडीया यांनी सांगितले की, पक्षी आपले मित्र असतात. त्यांना वाचविणे ही आपलीच गरज आणि कर्तव्य आहे. एकता पतसंस्थेने गेल्या महिन्यात चिमणी दिवसाचे औचित्य साधून पक्षीप्रेमी जळगावकरांना मोफत चिमणीचे घरटं आणि धान्य फिडर वाटप केले होते. पक्षांना पिण्यासाठी जितके पाणी लागते त्यापेक्षा नऊ पट पाणी त्यांनी अंघोळीसाठी घेणे ही त्यांची नैसर्गिक गरज आहे. पतसंस्थेतर्फे वाटप करण्यात येणाऱ्या बर्ड बाथटबमध्ये पाणी तापत नाही किंवा शेवाळही तयार होत नाही. असे हे टेराकोटा टब असल्याचे बरडीया यांनी सांगितले. मनोज गोविंदवार यांनी, पक्ष्यांची संख्या कमी होणं हे मनुष्यजातीच्या अस्तित्वाला धोका असल्याचे संकेत आहेत. आपल्या मुलांना येणाऱ्या पिढ्यांना नातवंडांना पण तू ना वारसा हक्क काही द्यायचं असेल तर समृद्ध निसर्ग दिला पाहिजे, पर्यावरणाचा समतोल दिला पाहिजे. येणाऱ्या काही वर्षात सर्वाधिक गरज याच गोष्टींची असणार आहे अन्यथा येणाऱ्या पिढ्या आपण नुसतं उपभोगलं आणि त्यांच्यासाठी काही ठेवलं नाही म्हणून रडतील ओरडतील. महावीर पाठशाळेतील मुलांवर देण्याचा संस्कार होतोय हा संस्कारच समाजाची आणि सध्याच्या काळाची सर्वात मोठी गरज असल्याचे गोविंदवार यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षाली देवरे यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रविण कोतकर, राधिका ठाकूर, हर्षा कुलकर्णी, किरण माहेश्वरी, प्राजक्ता अवचार, कल्पना पाटील, नितीन पाटील, सुभाष साळुंखे यांनी परिश्रम घेतले.