यावल–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात देशासाठी झटणाऱ्या सैनिकांसाठी “एक राखी सैनिको के नाम” या अनोख्या उपक्रमाचे आयोजन सलग तिसऱ्या वर्षी करण्यात आले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी आपले प्रेम व आपुलकी सैनिकांपर्यंत राखीच्या माध्यमातून पोहोचवली.
भारतीय सैनिक देशाच्या सीमांवर उभे राहून अखंड देशरक्षण करत असतात. त्यांच्या अथक सेवेमुळे आपण आपल्या घरी शांततेत व सुरक्षिततेत जीवन जगत आहोत. त्यांच्या या त्यागाची जाणीव ठेऊन महाविद्यालयात रक्षाबंधनाचे औचित्य साधून “एक राखी सैनिको के नाम” या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत सैनिकांसाठी राख्या संकलित करण्यात आल्या. या राख्या महाविद्यालयातील प्राध्यापक भगिनींनी व विद्यार्थिनींनी आपल्या स्वखर्चातून आणलेल्या होत्या.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे उपस्थित होत्या. त्या उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, “सैनिक हे आपल्या देशाच्या रक्षणासाठी आपला परिवार आणि सणवार दूर ठेवतात. अशा सैनिकांपर्यंत आपली भावना पोहोचवण्यासाठी हा उपक्रम केवळ राखी नव्हे तर प्रेमाचे आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे.”
संकलित केलेल्या राख्या त्रिपुरा येथे सेवा बजावत असलेल्या असिस्टंट सब-इन्स्पेक्टर क्लर्क महेंद्र पुंडलिक पाटील यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या. त्यांनी आपल्या भावूक मनोगतात सांगितले की, “बऱ्याच सैनिकांना बहिण नसते किंवा त्यांच्यापर्यंत राख्या पोहोचत नाहीत. हे राखी मिळणे आमच्यासाठी भावनिक आणि प्रेरणादायी ठरते. मी या सर्व राख्या व्यक्तिगतपणे सैनिकांना देईन आणि यामागील भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवीन.”
यावेळी महेंद्र पाटील यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपणही करण्यात आले. हा उपक्रम देशभक्तीच्या भावनेबरोबरच पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनेही प्रेरणादायक ठरला.
कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन प्रा. पी. व्ही. रावते यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. एम. डी. खैरनार यांनी मानले. या उपक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. एच. जी. भंगाळे, प्रा. मनोज पाटील, डॉ. आर. डी. पवार, डॉ. पी. व्ही. पावरा, प्रा. संजीव कदम, प्रा. संदीप मोरे, प्रा. सोनाली पाटील, मिलिंद बोरघडे तसेच इतर सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



