Home पर्यावरण ‘एक पेड माँ के नाम’ व ‘अमृतवृक्ष’ उपक्रमाने पर्यावरण पूजनाचा संदेश

‘एक पेड माँ के नाम’ व ‘अमृतवृक्ष’ उपक्रमाने पर्यावरण पूजनाचा संदेश


यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारत सरकारच्या ‘एक पेड माँ के नाम’ व ‘अमृतवृक्ष’ या हरित अभियानांची सुरुवात आज मोठ्या उत्साहात आणि पर्यावरणप्रेमाने झाली. महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागृती निर्माण करणे, तसेच त्यांच्यामध्ये पर्यावरणासाठी सकारात्मक विचार व जबाबदारीची भावना रुजवणे हा होता. याच अनुषंगाने महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या हस्ते विविध प्रकारच्या झाडांची लागवड करून समाजात एक सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने भाग घेतला आणि वृक्षारोपण करताना आपल्या आईच्या नावाने एक झाड लावण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमादरम्यान उपप्राचार्य प्रा. एम.डी. खैरनार, डॉ. जी.एच. भंगाळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. मनोज पाटील, प्रा. आर.एस. तडवी, प्रा. संदीप मोरे, प्रा. एन.एस. गवळे, प्रा. सोनाली पाटील, प्रा. सुनील पाटील, मिलिंद बोरखडे यांसह सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृक्षारोपणात सहभागी झाले. यावेळी परिसरात विविध औषधी, छायादार आणि फलद्रूप झाडांची लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन प्राध्यापकांनी केले.

‘एक पेड माँ के नाम’ आणि ‘अमृतवृक्ष’ हे उपक्रम केवळ एकदिवसीय नसून, यामध्ये लावलेले झाडे वाढेपर्यंत विद्यार्थ्यांनी त्यांची जबाबदारी घ्यावी, असा संदेशही यावेळी देण्यात आला. महाविद्यालयाने या उपक्रमाद्वारे पर्यावरण संरक्षण आणि मातृभक्ती यांचा सुंदर संगम घडवून आणला आहे.


Protected Content

Play sound