चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धुळ्याकडून चाळीसगावकडे येणार्या मेमू ट्रेनखाली आल्याने राजेंद्र भीमराव सूर्यवंशी (वय-५०, शिदवाडी) या गुराख्यासह आठ पाळीव जनावरांचा जागीच चिरडून मृत्यू झाल्याचे धक्कादायक घटना बुधवारी दुपारी शिदवाडी गावाजवळ घडली आहे. या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धुळ्याकडून निघालेली मेमू ट्रेन क्रमांक (०१३१०) ही चाळीसगावकडे निघाल्यानंतर खांबा क्रमांक ३४४ जवळ गुरांचा कळप रेल्वे रूळावर आल्यानंतर मेमूची जबर धडक बसल्याने दोन गायी, दोन बैल, दोन म्हशी, वासरू, पारडू अशी ८ जनावरे कापली जावून मयत झाली तर गुराखी राजेंद्र सूर्यवंशी हा देखील जखमी होवून ठार झाला. मेमूच्या जबर धडकेने काही जनावरे रेल्वे रुळापासून लांब फेकली गेली तर काही जनावरे रेल्वेखाली अडकली. अपघातानंतर सुमारे तासभर मेमू गाडी घटनास्थळी थांबून होती. रेल्वेखाली अडकलेली जनावरे काढल्यानंतर मेमू चाळीसगावकडे रवाना करण्यात आली.
सूत्रांच्या माहितीनुसार, मेमूच्या धडकेने मयत झालेली जनावरे शिदवाडी येथील प्रतापसिंग वजेसिंग जाधव यांच्या मालकिची होती व त्यांच्याकडे सालदार म्हणून राजेंद्र भीमराव सुर्यवंशी हे कामास होते. रेल्वे पटरीवर गुरे गेल्याने आणि समोरून रेल्वे येत असल्याने सुर्यवंशी हे गुरे हाकण्यासाठी धडपड करीत असतांनाच दुर्देवाने तेही रेल्वेखाली सापडून ठार झाले. सूर्यवंशी हे एका हाताने अपंग होते व ऊस तोडणीसाठी बाहेरगावी गेले होते व तेथून येवून ते पुन्हा मूळ मालकाच्या शेतात कामासाठी बुधवारपासून रूजू झाले होते. पहिल्याच दिवशी त्यांच्या दुर्देवी मृत्युने त्यांचा परीवार उघड्यावर पडला आहे. मृत राजेंद्रच्या पश्चात पत्नीसह मुलगा व मुलगी असा परीवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंब निराधार झाले आहे. या घटनेत प्रतापसिंग जाधव यांच्या मालकीचे सर्व पशुधन ठार झाल्याने सुमारे पाच लाखांचा फटका त्यांना बसला आहे.