जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील सुन्नी मुस्लिम बांधवांसाठी ईद उल फित्रच्या तारखेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला आहे. संपूर्ण देशात कुठेही चंद्रदर्शन न झाल्यामुळे यंदाची ईद उल फित्र शुक्रवारऐवजी शनिवार, दि. २१ मार्च २०२६ रोजी साजरी करण्यात येणार असल्याचे सुन्नी रुयते हिलाल कमिटीने स्पष्ट केले आहे.
या संदर्भात जळगावातील भिलपूरा येथील मरकझ सुन्नी जामा मस्जिदमध्ये मगरीब नमाजानंतर सुन्नी मुस्लिम धर्मगुरू आणि ट्रस्टींची बैठक पार पडली. या बैठकीत देशभरातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. चंद्रदर्शन न झाल्यामुळे इस्लामिक परंपरेनुसार ईदची तारीख एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे.

तसेच, ईद उल फित्रची नमाज शनिवार, दि. २१ मार्च रोजी सकाळी साडे आठ वाजता सुन्नी ईदगाह मैदान, नियाज अली नगर, सुप्रीम कॉलनी येथे अदा करण्यात येणार आहे. यासाठी सर्व मुस्लिम बांधवांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या निर्णयाची माहिती देताना सुन्नी ईदगाह ट्रस्ट व सुन्नी जामा मस्जिद भिलपूरा यांचे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली, मौलाना जाबीर रजा, मौलाना नजमुल हक, इकबाल वजीर, मौलाना अब्दुल रहीम, मौलाना युनुस रजा, मौलाना नूर मोहम्मद, सय्यद जावेद, मुख्तार शाह आणि शाकीर चित्तलवाला यांनी नागरिकांना शिस्तबद्ध पद्धतीने नमाज अदा करण्याचे आवाहन केले आहे.
ईद हा बंधुभाव, शांतता आणि एकात्मतेचा सण असून, सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देत आनंद साजरा करावा, असा संदेशही यावेळी देण्यात आला.



