मुंबई-वृत्तसेवा | राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर शनिवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दांत टीका केली. एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी केंद्रातील भाजप नेतृत्व, राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार प्रहार केला.

शिवसेना ही केवळ ठाकरे यांचीच असून शिंदे गट हा भाजपच्या मदतीने उभा केलेला कृत्रिम गट असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. मराठी मतांचे विभाजन करून मुंबईवर नियंत्रण मिळवण्याचा भाजपचा हा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. धनुष्यबाण चिन्ह, शिवसेनेचे नाव आणि पक्षाची ओळख चोरून भाजपने कागदोपत्री शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. या मुलाखतीदरम्यान भावुक झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यांत पाणी आले. मात्र त्यांनी ते अश्रू नसून अंगार असल्याचे सांगत मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे डोळे जळजळत असल्याचे कारण दिले.

अलीकडील बिनविरोध निवडणुकांवर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर दबाव आणि यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप केला. भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असतील तर विरोधी पक्षांचे उमेदवार का रोखले जात आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. निवडणूक अधिकाऱ्यांवर कोणत्या मंत्र्यांचे फोन गेले याची चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
भाजपवर आरोप करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबई महापालिकेच्या हजारो कोटींच्या ठेवी चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आल्या. या निधीचा वापर कंत्राटदारांसाठी नव्हे, तर कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि शहराच्या गरजांसाठी असतो, हेही त्यांनी अधोरेखित केले.
मुंबईची आर्थिक ताकद कमी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वी अजित पवारांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी, ते आरोप सिद्ध करावेत किंवा जाहीर माफी मागावी, असे आव्हान दिले. सत्तेसाठी आरोप विसरून हातमिळवणी करण्याची ही पद्धत महाराष्ट्राच्या राजकारणासाठी धोकादायक असल्याचेही त्यांनी सांगितले.



