खाद्य तेल महागणार; केद्राकडून आयात शुल्कात वाढ

दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गणेश उत्सव सध्या जोशात सुरु आहे, तर त्यानंतर पितृ पंधरवडा लागेल, तो संपला की नवरात्र उत्सव सुरु होईल आणि त्यानंतर दिवाळी व ऐन सणासुदीच्या काळात खाद्य तेल महागणार आहे. नवरात्रात नऊ दिवसांचे उपास असतात, दिवाळीत फराळ तयार केला जातो. या सगळ्यासाठी खाद्य तेल वापरले जाते. ऐन सणासुदीच्या काळात खाद्य तेलांच्या किंमती वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे तर गृहिणींचं महिन्याचं बजेट कोलमडणार आहे हे निश्चित. पीटीआयच्या वृत्तानुसार सरकारने क्रूड, रिफाईंड सनफ्लॉवर ऑईल आणि अन्य खाद्य तेलांवरील कस्टम ड्युटी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आयात शुल्कात २० टक्के वाढ करण्यात आल्याने खाद्य तेल महागणार आहे. ऐन सणासुदीत ही दरवाढ झाल्याने आता बजेट कसं मांडायचं हा प्रश्न सगळ्यांनाच सतावणार आहे.

अर्थ मंत्रालयाकडून एक अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यानुसार, क्रुड आणि रिफाइंड पाम तेल, सोयाबीन तेल आणि सनफ्लॉवर सीड तेल यांवर बेसिक कस्टम ड्युटी वाढवण्यात आली आहे. क्रुड पाम ऑइल, क्रूड सोयाबीन तेल आणि क्रुड सनफ्लॉवर सीड ऑइलवर बेसिक कस्टम ड्युटीचे दर आत्तापर्यंत शून्य होती. म्हणजेच या तेलांवरील आयात शुल्क लागत नव्हते. आता हेच आयात शुल्क वाढून २० टक्के करण्यात आलं आहे. तर, रिफाइंड सनफ्लॉवर सीड ऑइल, रिफाइंड पाम ऑइल, रिफाइंड सोयाबीन तेलांवर बेसिक ड्युटीचे दर वाढवून ३२.५ टक्के करण्यात आले आहे. हा बदल सप्टेंबर महिन्यातच होणार आहे. त्यामुळे खाद्य तेल महाग होणार यात काही शंकाच नाही.

 

Protected Content