ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीचा छापा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीने छापा टाकला आहे. ईडीचे दहा ते बारा अधिकारी वायकर यांच्या घरी दाखल झाल्याची माहिती आहे. जोगेश्वरी येथील भूखंड घोटाळ्याप्रकरणी वायकर हे ईडीच्या रडारवर होते. सकाळी 8:30 वाजल्यापासून ईडीचे अधिकारी वायकर यांच्या घरी दाखल झाल्याचे बोलले जात आहे. आमदार रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब या निवासस्थानासह अशा एकूण चार ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून रवींद्र वायकर आणि कुटुंबीयांची कसून चौकशी सुरू आहे.

दरम्यान, सकाळी 8:30 वाजता ईडीचे अधिकारी वायकर यांच्या घरी दाखल झाले. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. ईडीचे अधिकारी दाखल होऊन 2 तास झाले आहेत. सध्या अधिकाऱ्यांकडून संबंधित कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. भाजपचे आमदार किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे याबाबत तक्रार केली होती.

सर्वात आधी जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने वायकरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ईडीनेही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या वायकरांसमोर अडचणवी वाढल्या आहेत. मुंबई पोलिसांसह ईडीकडूनही वायकरांची चौकशी केली जात आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला होता. वायकर यांनी मुंबईच्या जोगेश्वरी येथील महापालिकेच्या राखीव भूखंडावर एक पंचतारांकित हॉटेल बांधल्यासंबंधीची ही तक्रार होती. रवींद्र वायकर यांनी हे हॉटेल बांधण्यापूर्वी महापालिकेची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. हा सुमारे 500 कोटींचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. या तक्रारीनुसार आर्थिक गुन्हे शाखेने वायकर यांना चौकशीसाठीही बोलावले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

Protected Content