लातूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याची विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय.जी. खोब्रागडे यांनी बुधवारी डॉ. काळगेंसह प्रतिवादींना नोटीस बजावण्याचा आदेश दिला. या याचिकेवर सप्टेंबरमध्ये सुनावणी होणार आहे.लोकसभेच्या निवडणूकीतील पराभूत उमेदवार नरसिंग उदगीरकर यांनी या याचिकेसह डॉ. काळगे यांच्याविरुद्ध निवडणूक याचिका दाखल केली आहे.
उदगीरकर यांनी याचिकेत म्हटल्यानुसार डॉ. काळगे यांनी पुणे येथील समाज कल्याण कार्यालयात १९८६ सालची काही शालेय कागदपत्रे सादर करुन माला जंगम जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी दावा दाखल केला होता. या कार्यालयाने आणखी काही कागदपत्रांची मागणी करुन प्रकरण लातूरच्या समितीकडे पाठविले. डॉ. काळगे माला जंगम असल्याचे सिद्ध करु शकले नाही, असा अहवाल लातूरच्या समितीने पाठविला. डॉ. काळगे यांच्या शालेय रेकॉर्डमध्ये हिंदू जंगम अशी नोंद होती. १९७६ ला मुख्याध्यापकांनी माला शब्द जोडला. तसेच शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी न घेता जन्मतारखेतही खाडाखोड केली. या कारणावरुन पुणे येथील समाज कल्याण कार्यालयाने डॉ. काळगे यांचा जातीचा दावा अवैध ठरविला. त्याविरुद्ध त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांकडे अपील केले असता त्यांनी जातीचा दावा वैध ठरविला होता.