भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील सर्वात धक्कादायक निकाल भुसावळ येथे लागला असून मंत्री संजय सावकारे यांच्या सौभाग्यवती रजनीताई सावकारे यांना पराभवाचा फटका बसला असून यातून माजी आमदार संतोष चौधरी यांनी आपल्या कधी काळच्या चेल्याला धोबीपछाड मारला आहे.
भुसावळ येथील नगरपालिका निवडणुकीत यंदा जबरदस्त लढत झाली. लोकनियुक्त नगराध्यक्षपद हे एससी महिला या प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे मंत्री संजय सावकारे यांच्या सौभाग्यवती रजनीताई सावकारे यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली. यावरून विरोधकांनी टिका केली. आणि निवडणुकीच्या काळात हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला. तर निवडणुकीच्या प्रारंभीच भारतीय जनता पक्षाचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने त्यांचा उत्साह शिगेला पोहचला. विरोधकांच्या माध्यमातून कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत सस्पेन्स लागला होता. यात माजी आमदार संतोषभाऊ चौधरी यांनी लेवा पाटीदार समाजाची सून असलेल्या गायत्री भंगाळे-गौर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. यामुळे ही लढत अतिशय रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळाले होते. तथापि, या निवडणुकीत विरोधकांची एकजूट न होता अनेक उमेदवार उभे राहिल्याने ही लढत बहुरंगी झाली.
या काँग्रेसच्या वतीने सवीता सुरवाडे यांना उमेदवारी मिळाली. फायरब्रँड नेते जगनभाई सोनवणे यांच्या सौभाग्यवती पुष्पाताई सोनवणे यांनी देखील उमेदवारी केली. तर ऐन वेळेस राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील आपला उमेदवार मैदानात उतारला. यामुळे येथील लढाई ही बहुरंगी झाली. या निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुसावळ येथे प्रचारसभा घेतली. यासोबत रक्षाताई खडसे, गिरीशभाऊ महाजन यांच्या सारख्या नेत्यांनी देखील सभा घेतल्या. तर विरोधकांकडून आ. एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद आणि सभेच्या माध्यमातून मैदान गाजविले. तरी प्रचाराची खरी सुत्रे ही संतोष चौधरी आणि अनिल चौधरी या बंधूंनी सांभाळली.
त्यांनी प्रचाराच्या दरम्यान संजय सावकारे यांच्यावर जोरदार टिका केली. यात विशेष करून अनिल चौधरी यांनी भुसावळ फाईल्स या नावाने गौप्यस्फोट करत सावकारेंवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. तर संजय सावकारे यांनी देखील याला जोरदार प्रत्युत्तर दिले. या जोरदार शाब्दीक चकमकीमुळे निवडणुकीत रंग भरला. शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली.
या पार्श्वभूमिवर, आज रविवार दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू झाली. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये रजनी सावकारे यांनी आघाडी घेतली. हळूहळू ही आघाडी दहा हजारांच्या पलीकडे गेल्याने त्यांचा विजय होणार असल्याचे मानले जात होते. मात्र शेवटच्या फेऱ्यांमध्ये गायत्री भंगाळे यांनी जोरदार कमबॅक केले. शेवटी तर अतिशय अटीतटीची चुरस निर्माण झाली. यातून अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या गायत्री भंगाळे यांनी 627 मतांनी विजय संपादन केला.
या अनपेक्षीत पराभवामुळे मंत्री संजय सावकारे यांना जबर धक्का बसला असून माजी आमदार संतोष चौधरी यांनी तब्बल नऊ वर्षानंतर कमबॅक केले आहे. हा पराभव भुसावळच्या राजकारणाची आगामी दिशा दर्शविणारा ठरू शकतो असे मत राजकीय निरिक्षकांनी व्यक्त केले आहे.



