पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मागील कित्येक महिन्यापासून राज्यपाल नियुक्त विधान परिषद आमदारांच्या नियुक्त्या प्रलंबित होत्या. या नियुक्त्या कधी होणार याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले असताना महायुतीमधील सात सदस्यांना काल विधान परिषद सदस्यत्वपदाची शपथ देण्यात आली. हेमंत पाटील, शिवसेना (एकनाथ शिंदे), मनिषा कायंदे, शिवसेना (एकनाथ शिंदे), पंकज भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), इद्रिस इलियास नाईकवाडी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), महंत बाबूसिंग महाराज, बंजारा समाजाचे धर्मगुरु (भाजपा), विक्रांत पाटील (भाजपा), चित्रा वाघ (भाजपा) महायुतीमधील या सात सदस्यांचा समावेश आहे.
या राज्यपाल नियुक्त आमदारकीवरून महायुतीमधील अजित पवार गटामध्ये नाराजी पाहण्यास मिळाली असून अजित पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर यांची राज्यपाल नियुक्त आमदारकी देण्यात आली नाही. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाच्या पुणे शहरातील ६०० पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले. त्यामुळे पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मात्र या एकूणच परिस्थितीवर दिपक मानकर यांनी काल कोणतीही भूमिका मांडली नव्हती. कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्याने दिपक मानकर काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. त्या पार्श्वभूमीवर दिपक मानकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडताना म्हटले की, मी मागील ४० वर्षांपासून राजकीय आणि समाजिक जीवनात आहे. या संपूर्ण कालावधीत राजकीय जीवनात अनेक पदे भूषविली आणि पदांना न्याय देण्याच काम केले आहे. त्याच दरम्यान मागील दीड वर्षापूर्वी माझ्यावर पुणे शहर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि त्या पदाला न्याय देऊन विविध पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षासोबत जोडण्याचे काम केले आहे.