Home Cities जळगाव ई-वाहनधारकांनो ‘ही’ बातमी तुमच्यासाठी !

ई-वाहनधारकांनो ‘ही’ बातमी तुमच्यासाठी !


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना इलेक्ट्रिक दुचाकी व चारचाकी वाहनांमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. वाढत्या तापमानामुळे लिथियम आयन बॅटरी गरम होण्याचा धोका वाढतो आणि अशा वेळी वाहन पूर्णपणे जळून खाक होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे वाहनधारकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

ई-वाहनांमध्ये प्रामुख्याने लिथियम आयन बॅटरीचा वापर केला जातो. यात ‘एलएफपी’ (लिथियम आयन फॉस्फेट) आणि ‘एनएमसी’ (निकेल मँग्नीज कोबाल्ट) असे दोन प्रकार असतात. यापैकी ‘एलएफपी’ बॅटरी तुलनेने अधिक सुरक्षित मानली जाते, तर ‘एनएमसी’ बॅटरीमध्ये बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिम (बीएमएस) मध्ये बिघाड झाल्यास तापमान नियंत्रण बिघडून आग लागण्याचा धोका वाढतो. याशिवाय निकृष्ट दर्जाचे साहित्य, ओव्हरचार्जिंग, अतिउष्णता, बॅटरी किंवा चार्जरमधील दोष, तसेच थर्मल मॅनेजमेंटचा अभाव ही आग लागण्याची प्रमुख कारणे मानली जात आहेत.

तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात ई-वाहन सावलीत पार्क करणे अत्यंत आवश्यक आहे. बाहेरून वाहन चालवून आल्यानंतर लगेच चार्जिंग न करता किमान १५ मिनिटे थंड होऊ द्यावे. शक्यतो सकाळी लवकर किंवा सायंकाळी थंड वातावरणात चार्जिंग करावे. रात्रभर वाहन चार्जिंगला ठेवणे टाळावे. बॅटरीमधून धूर किंवा विचित्र वास येत असल्यास तात्काळ चार्जिंग थांबवून अधिकृत सेवा केंद्राशी संपर्क साधावा. तसेच बॅटरी, वायरिंगमध्ये सूज किंवा गळती दिसल्यास तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी. वाहन नेहमी हवेशीर आणि ज्वलनशील वस्तूंपासून दूर ठेवून चार्ज करावे, असेही सांगण्यात आले आहे.

उन्हाळ्यात ई-वाहनांच्या बॅटरीवर उष्णतेचा परिणाम अधिक होत असल्याने वाहनधारकांनी योग्य चार्जिंग पद्धती, नियमित तपासणी आणि सुरक्षित पार्किंग यांसारख्या उपाययोजना केल्यास आगीच्या घटना टाळता येऊ शकतात. तसेच उत्पादक कंपन्यांनीही सुरक्षित तंत्रज्ञान आणि दर्जेदार प्रणाली वापरणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.


Protected Content

Play sound