मुंबई वृत्तसेवा । राज्यभरात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत अनेक पात्र महिलांना पैसे न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत होती. काही ठिकाणी मोर्चे काढून महिलांनी आपला आक्रोशही मांडला होता. अर्ज प्रक्रियेदरम्यान ई-केवायसी संदर्भातील चुकीचे पर्याय निवडले गेल्याने अनेक महिलांचे हप्ते थकले होते. मात्र आता या लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला असून महिला व बालविकास विभागाने ई-केवायसीचे पोर्टल पुन्हा सुरू केले आहे. या माध्यमातून 31 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन दुरुस्ती करता येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून ई-केवायसीचे पोर्टल बंद असल्यामुळे हजारो महिलांचे अनुदान थांबले होते. यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये संतापाची लाट पसरली होती. या परिस्थितीची गंभीर दखल घेत महिला व बालविकास विभागाने तातडीने निर्णय घेत पोर्टल पुन्हा सुरू करण्याचे आदेश जारी केले. या निर्णयामुळे पात्र महिलांना थकित रक्कम मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत आधार प्रमाणीकरणाची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र या प्रक्रियेत कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत आहे का किंवा निवृत्तीवेतन घेतो का, या प्रश्नांबाबत अनेक महिलांकडून चुकीचे पर्याय निवडले गेले. या तांत्रिक चुका झाल्याने अनेक पात्र अर्जांबाबत संभ्रम निर्माण झाला आणि त्याचा थेट परिणाम लाभ वितरणावर झाला.
या त्रुटींमुळे लाभार्थ्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी शासनाने 20 जानेवारी रोजी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पडताळणीचे आदेश दिले होते. मात्र प्रत्यक्ष पडताळणी प्रक्रियेत वेळखाऊ अडचणी येत असल्याने ऑनलाईन पद्धतीनेच माहिती दुरुस्तीची संधी देण्यात यावी, अशी मागणी लाभार्थी महिला व क्षेत्रीय कार्यालयांकडून होत होती. अखेर शासनाने ही मागणी मान्य करत ई-केवायसी दुरुस्तीची सुविधा पुन्हा सुरू केली आहे.
ज्या महिलांनी अर्ज करताना चुकीचा पर्याय निवडला होता, त्या आता पोर्टलवर लॉगिन करून आवश्यक दुरुस्ती करू शकणार आहेत. ही सुधारणा करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आली असून, यामुळे हजारो महिलांना योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



