अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासनाच्या पीएम किसान योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे गरजेचे असून १४ सप्टेंबर पर्यंत केवायसी न केल्यास शेतकऱ्यांना पेन्शन योजनेचा लाभ मिळणार नाही असे आवाहन तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी केले आहे.
शासनाच्या पी एम किसान योजना, ई-पीक पेरा, पाहणी व मतदार कार्ड आधार कार्ड शी संलग्न (लिंक) करण्यासाठी उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत आदी ठिकाणी जनजागृती सुरू आहे. पारदर्शी कारभार, बोगस मतदार वगळणे, योग्य लाभार्थ्यांला मदत, पीक विमा मिळणे, शेतकऱ्याला पेन्शन मिळणे जेणेकरून कुठलाही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही तथा आत्महत्या करणार नाही यासाठी शासन जनतेच्या दारी जाऊन जनजागृती करीत आहे.
ई-केवायसीचे ७३ टक्के काम झाले आहे. अंतिम मुदत १४ सप्टेंबर तसेच ई-पीक पाहणीची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर तर मतदार कार्ड आधारला लिंक करण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर आहे. ई पीक पाहणी न केल्यास शेतकऱ्याला पीक विमा, शासन मदत, अनुदान मिळणार नाही. मतदार कार्ड लिंक न केल्यास मतदानाचा अधिकार मिळणार नाही म्हणून नागरिकांनी, शेतकऱ्यांनी, मतदारांनी, ग्रामस्थांनी सर्व बाबींची ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन ही तहसीलदार वाघ यांनी केले आहे.
मंडळाधिकारी दिनेश सोनवणे, तलाठी गणेश महाजन व शिक्षक संजय पाटील यांनी विजयनाना आर्मी स्कूल, शिवाजी हायस्कूल, स्व. अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालय, जययोगेश्वर माध्यमिक विद्यालय, प्रताप महाविद्यालय, अल्फाईज उर्दू हायस्कूल आदी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना माहिती देऊन जनजागृती केली.
यासाठी प्राचार्य पी. एम. कोळी, प्राचार्य पी. आर. शिरोडे, उपप्राचार्य जी. एच. निकुंभ, मुख्याध्यापक एम. ए. पाटील, मुख्याध्यापक प्रकाश पाटील, मुख्याध्यापक संजय सोनवणे, मुख्याध्यापिका अनिसा शेख, उमेश काटे आदींचे सहकार्य लाभले.