जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नक्षल ऑपरेशन दरम्यान केलेल्या शौर्यपुर्ण कामगिरीबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाला सोनवणे यांना शौर्यपदक जाहीर झाले आहे. तर जळगाव जिल्हा पोलीस दलातील विशेष सेवेबद्दल सध्या धुळे येथे कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार देविदास वाघ यांना राष्ट्रपदी पदक जाहीर करण्यात आला आहे.
सन २०१९मध्ये कुणाल सोनवणे यांनी थेट गडचिरोली जिल्ह्यातून पोलिस दलातील सेवेला सुरुवात केली. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे २०१९ ते २०२१ या दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून काम पाहत असताना तेथे नक्षली चकमकींना त्यांनी उत्तरे दिली. ‘नक्षल ऑपरेशन’ दरम्यान बजावलेल्या शौर्यपूर्ण कामगिरीची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे. भामरागड येथील सेवेनंतर सोनवणे यांनी जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे २०२१ ते २०२३ या दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून काम पाहिले. सध्या गेल्या सहा महिन्यांपासून ते चोपडा येथे कार्यरत आहेत. त्यांना या पूर्वीही केंद्रीय गृह विभागाच्यावतीने अंतर्गत सुरक्षा पदक, खडतर सेवा पदक, पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह असे पुरस्कार मिळाले आहेत.
जळगाव जिल्हा पोलिस दलात केलेल्या विशेष सेवेबद्दल सहाय्यक फौजदार देविदास वाघ यांना २०२२-२०२३ या वर्षासाठीचे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. सन १९९१मध्ये पोलिस शिपाई म्हणून रुजू झालेले वाघ सध्या धुळे जिल्ह्यात सहायक फौजदार म्हणून काम पाहत आहे. ३४ वर्षांच्या सेवेत त्यांना चार पदकं मिळाले आहेत. जळगावातील शनिपेठ, जळगाव शहर पोलिस ठाणे, पोलिस मुख्यालयात प्रशिक्षक म्हणून त्यांनी सेवा बजावली. तसेच नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकॅडमीतील प्रशिक्षण केंद्रात ११ वर्षे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. २०२१-२२ या वर्षात क्यूआरटीच्या जवानांनाही त्यांनी प्रक्षिक्षण दिले. त्यांना आतापर्यंत पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह, केंद्रीय गृहमंत्री यांचे उत्कृष्ट प्रक्षिक्षक पदक, राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार असे पुरस्कार मिळाले आहे. आता राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.