जळगाव (प्रतिनिधी) भर उन्हाळ्यात एकीकडे सगळे होरपळून निघत असताना आणि गावोगाव लोक पाण्यासाठी तरसत असताना तालुक्यातील म्हसावद येथे मात्र आज (दि.२९) भरदुपारी गावाला पाणीपुरवठा करणारी टाकी सुमारे एक तास ओसंडून वाहत होती. याकडे तेथील ग्रामपंचायत प्रशासनाचे मात्र अक्षम्य दुर्लक्ष झालेले दिसून आले.
भर उन्हाळ्यात भर दुपारी गावातली सार्वजनिक पाणीपुरवठ्याची टाकी तासभर वाहत असताना या प्रकारची कुणीही दाखल घेतली नाही. या टाकीत पाणी भरण्याची जबाबदारी असलेले कर्मचारी कुठे होते ? त्यांनी आपले कर्तव्य का बजावले नाही ? त्याचवेळी कुणी जागृत ग्रामस्थांनीही पाण्याचा हा अपव्यय का थांबवला नाही ? असे अनेक प्रश्न यातून उपस्थित होत आहेत. एकीकडे शासन पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून योजना आखते, लोकांना प्रशिक्षण देते तर दुसरीकडे जिथे पाणी उपलब्ध आहे, तिथे जनतेचे असे बेजबाबदार वर्तन दिसून येते. ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’चे कर्मचारी म्हसावद येथून योगायोगाने जात असताना त्यांच्या नजरेस हा प्रकार पडल्याने उघडकीस तरी आला. गावोगाव अशाप्रकारे किती पाणी लोकांच्या बेजबाबदारपणामुळे वाया जात असावे, याची कल्पनाच केलेली बरी. अशाप्रकारांना आळा घालून संबंधितांवर कठोर कारवाई केली जावी, एवढीच अपेक्षा सुज्ञ लोकातून व्यक्त होत आहे.