चाळीसगाव, दिलीप घोरपडे | आज-काल प्रत्येक माणसाचे जीवन धकाधकीचे झालेले आहे. नोकरी-व्यवसाय आणि प्रपंच हे सांभाळत असताना शरीराला मोठा ताण तणाव सहन करावा लागतो, आणि यामधून शारीरिक व्याधी निर्माण होत असतात. रक्तदाब कमी जास्त होणे, मधुमेह होणे, अशा प्रकारचे त्रास माणसाला जडतात. याकरीता आपले उद्योग, व्यवसाय व नोकरी सांभाळत असतानाही मन आणि शरीर तणावमुक्त ठेवण्यासाठी त्याला निसर्गाच्या सानिध्याची प्रचंड आवश्यकता आहे.
या निसर्ग सानिध्यात आपल्याला स्वच्छ हवा, निर्मळ पाणी तर मिळतेच मात्र निसर्गात जात असताना जर गड-किल्ल्यांवर गेलो तर निसर्ग आणि इतिहास दोन्ही अनुभवता येतो. गड-किल्ल्यांच्या इतिहासातून प्रेरणा मिळते, त्यावरील बुरूज, तटबंद्या, दगडी कोरीव पायवाटा, भुयारे, कोठारे हे पाहून स्फूर्ती मिळते. किल्ल्यावरील इतिहास व मावळ्यांचा त्याग याची माहिती झाल्यास आयुष्याशी खंबीरपणे लढण्याची प्रेरणा मिळते. तेथील सभोवतालच्या परिसरातील हिरवळ, झुळझुळ वाहणारे झरे व स्वच्छंदपणे वाहणारा निर्मळ वारा, मन प्रफुल्लीत करून जातात. त्याचवेळी कातळ कड्यातील अवघड वाट चढून गडकोटांच्या माथ्यावर गेल्यावर एक अविस्मरणीय थरार अनुभवल्याचा आनंद वेगळाच असतो. याच बरोबर गडकिल्ल्यांच्या संवर्धन कार्यात सहभाग घेण्याचे भाग्य लाभले तर काही तरी चांगले काम केले, याचे समाधानही मनाला नक्कीच मिळते. म्हणूनच शरीर निरोगी आणि आनंदी रहावे, असे वाटत असेल तर प्रत्येकाने महिन्या दोन महिन्यातून एकवेळ निसर्ग सानिध्यात पर्यायाने गड किल्ल्यावर जावे आणि आपले सुंदर आयुष्य आणखी सुंदर करण्याचा प्रयत्न नक्कीच करावा.