जळगाव प्रतिनिधी । दिवंगत स्वातंत्र्य सैनिकाच्या बहिणीचा मुलगा असल्याचे भासवून बनावट नामनिर्देशन सादर करणार्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिले आहेत.
याबाबत वृत्त असे की, प्रकाश रामकृष्ण सैंदाणे (रा.वेळोदे ता.चोपडा) हा विभागीय सहनिबंधक कार्यालय नाशिक येथे सब ऑडिटरचे म्हणून कार्यरत आहे. चोपडा तालुक्यातील कुरवेल येथील जयराम तुळशीराम कोळी या दिवंगत स्वातंत्र्य सैनिकांच्या बहिणीचा मुलगा असल्याचे भासवून सैंदाणे याने सन १९९१ मध्ये कोळी यांचे स्वातंत्र्य सैनिकाचे नामनिर्देशन सादर केले होते. त्या आधारे त्याने विभागीय सहनिबंधक कार्यालय नाशिक येथे नोकरी मिळवली. दरम्यान, जयराम कोळी यांच्या नातवाने अजोबाचे स्वातंत्र्य सैनिकाचे नामनिर्देशन सादर करून सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला असता प्रकाश सैंदाणे यांनी आधीच यावर नोकरी मिळवल्याचे त्यांना आढळून आले. यामुळे स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा साहेबराव जयराम कोळी यांनी या प्रकाराबाबत लोकायुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावर अपर जिल्हाधिकार्यांनी सुनावणी घेतली. यात या प्रकरणी तथ्य आढळून आल्याने अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी बनावट स्वातंत्र्य सैनिकाचे बनावट नामनिर्देशन जोडणार्या प्रकाश रामकृष्ण सैंदाणे याच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्याचे निर्देश चोपडा येथील तहसीलदारांना दिले आहेत.