जळगाव प्रतिनिधी । शहरातील एस.टी. वर्कशॉपजवळ डंपरने चिरडल्यामुळे एक सायकलस्वार ठार झाल्याची घटना आज सकाळी घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नेरी नाका स्मशानभुमीच्या पुढे असलेल्या एस.टी. वर्कशॉपच्या जवळ आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास भरधाव जाणार्या डंपरने ( एमएच १९ झेड-८०२४ ) सायकलला धडक दिली. यावर स्वार असणारा मुरलीधर वेडू शिंदे ( ( वय ७३, अयोध्यानगर जळगाव ) हे जागीच ठार झाला. शहरातल्या मोठ्या प्रमाणात वर्दळ असणार्या रस्त्यांवरून अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात. यातील बहुतांश चालक हे अर्धशिक्षित असून त्यांच्या वाहनावर क्लीनरदेखील नसतो. यातच रस्ता आपल्या बापाचाच असल्याच्या अविर्भावात ते भरधाव वेगाने जात असतात. यातून आधी अनेकदा दुर्घटना घडल्या असून आजच्या दुर्घटनेमुळे हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी डंपरचालक नरेंद्र रमेश मराठे (वय२२, रा. पार्वतीनगर, जळगाव) याला अटक करण्यात आली असून गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, या अपघातात मृत्युमुखी पडलेले मुरलीधर वेडू शिंदे हे सेवानिवृत्त एस.टी. कर्मचारी होते. आज सकाळी ते स्टेट बँकेत पेन्शन घेण्यासाठी जात असतांनाच डंपरने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असणार्या बँकेच्या पासबुकवरूनच शिंदे यांची ओळख पटली. त्यांचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणला असून येथे त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश पाहून उपस्थित हेलावले.