यावल( प्रतिनिधी) तालुक्यातील विविध ग्राम पंचायतींचे प्रश्न मार्गी लावणाऱ्या पंचायत समितीचेच प्रश्न मार्गी लागत नसल्याने तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती भ्रष्टाचार आनियमिता, नियोजनाचा अभाव या सर्व विषयावर निष्क्रीय दिसुन येत असल्याने तालुक्याच्या ग्रामीण भागातील अडचणीत मोठी वाढ झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, यावल पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी वाय.पी. सपकाळे हे गेल्या सात महिन्यात प्रथम उपचारांसाठी नंतर लागलीच वर्धा जिल्ह्यात बदली करून घेतली म्हणून तालुक्याबाहेरच आहेत. तेव्हापासून येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाला ग्रहण लागल्यासारखे झाले आहे. या पंचायत समितीत प्रभारी गटविकास अधिकारी म्हणुन किशोर सपकाळे हे मागील काही महीन्यापासुन हे पद सांभाळुन आहेत. किशोर सपकाळे यांच्याकडे पुर्वीपासुन सहाय्यक गटविकास अधिकारी, ग्राम पंचायत विस्तार अधिकारी ही पदे आहेत. म्हणजेच एकच अधिकारी हा तीन विभागाचे कार्य सांभाळत आहे. या सर्व परिस्थितीत पंचायत समिती अडकली असल्याने तालुक्यातील डोंगरदे गावातील अज्ञात आजाराने मयत झालेली लहान मुले असो, डोंगरकठोरा ग्रामपंचायतीच्या दलीत वस्तीच्या निधीचा प्रश्न असो, पिळोदा, कोरपावली, हिंगोणा किंवा मारूळ ग्रामपंचायतींचे प्रश्न असो. या सर्व ग्राम पंचायतीच्या प्रशासकीय कारभारात भ्रष्टाचाराचे कळस गाठला असुन याविषयी प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत काही सुज्ञ प्रशासकीय जाणकारांच्या मते तालुक्यात ग्रामपंचायतींच्या कारभारावर प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने या सर्व गोंधळाला चालना मिळत असल्याचे सांगुन जोपर्यंत येथील पंचायत समितीला कायमस्वरूपी सक्षम गटविकास अधिकारी मिळत नाही, तो पर्यंत पंचायत समितीच्या प्रशासकीय कारभारत सुसुत्रता येणार नसल्याचे व गंभीर प्रश्न मार्गी लागणार नाही असे दिसुन येत आहे. तरी जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ यावल पंचायत समितीत सक्षम अशा कायमस्वरूपी गटविकास अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात येत आहे.