अपारंपरिक ऊर्जा वापरामुळे भविष्यात विजेचे दर कमी होणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यात सध्या अपारंपारीक ऊर्जेचा वापर एकूण ऊर्जेच्या 16 टक्के होत असून सन 2030 पर्यंत हे प्रमाण 54 टक्के होणार आहे. यामुळे आगामी काळात विजेचे दर कमी होतील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले.

नागपूर येथील वनामती सभागृहात विदर्भ व मराठवाड्याचे पायाभूत सुविधा सक्षमीकरण व विस्तारीकरणाच्या 1 हजार 734 कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ, नागपूर जिल्ह्यातील 313 कोटी रुपयाचा विद्युत यंत्रणा बळकटीकरण, पंतप्रधान सुर्यघर मोफत वीज योजने अंतर्गत विदर्भातील लाभार्थी ग्राहकांचा सन्मान तसेच मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजने अंतर्गत शेतकऱ्यांचा सन्मान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर आमदार ॲड. आशिष जायस्वाल, डॉ. परिणय फुके, अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, संचालक (संचालन) अरविंद भादिकर व संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे उपस्थित होते.

नागपूर शहर वेगाने वाढत असून सभोवतालच्या परिसरामध्ये चांगल्या प्रकारचा अखंडित वीज पुरवठा करण्याला प्राधान्य देण्यात आले असून त्यासाठी वीजेच्या वितरणाचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे. नागपूर जिल्ह्यातील वीज वितरण यंत्रणा बळकटीकरणासाठी 313 कोटी रुपयाच्या योजना राबविण्यात येत असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे. त्यासोबतच शहरातील विजेचे जाळे भुमिगत करण्यात येणार असल्यामुळे शहराचे सौदर्यीकरण वाढणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

त्यांनी सांगितले की, राज्यात आतापर्यंत 40 हजार मेगावॅट स्थापीत क्षमता होती परंतु मागील अडीच वर्षात केलेल्या नियोजनामुळे पुढील पाच वर्षात 45 हजार मेगावॅट क्षमता अतिरिक्त वाढणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात व राज्यात अखंडित वीज पुरवठा करणे सुलभ होणार आहे.

बळीराजा योजनेंतर्गत आता शेतक-यांचे वीज बील राज्य शासन भरणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना कृषीपंपांसाठी लवकरच दिवसा 12 तास वीज पुरवठा करण्यात येणार असल्यामुळे रात्रीच्या वेळी सिंचनाची आवश्यकता राहणार नाही. मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजना 2.0 चे पंतप्रधानांनी स्वागत केले आहे. सौर वीज निर्मीतीचे महाराष्ट्र मॉडल संपूर्ण देशात राबविण्याची सूचना त्यांनी केली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पंतप्रधान सुर्यघर मोफत वीज योजने अंतर्गत राज्यातील दुसरे सौरग्राम पुणे जिल्ह्यातील टेकवडीचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. गावचे सरपंच विठ्ठल शत्रृघ्न शिंदे यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन उपमुख्यमंत्र्यांनी गौरव केला. नागपूर जिल्ह्यातील बळीराजा मोफत वीज योजना व पंतप्रधान सुर्यघर मोफत वीज योजनेतील लाभार्थ्यांचा यावेळी सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महवितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे व कार्यकारी संचालक धनंजय औढेकर यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी प्रादेशिक संचालक (नागपूर परिक्षेत्र) परेश भागवत, कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर, सुनिल पावडे, दत्तत्रय पडळकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

Protected Content