जळगाव, प्रतिनिधी | मनपाच्या मुदत संपलेल्या व्यापारी गाळ्यांची कोट्यवधी रुपयांची थकबाकी गाळेधारकांवर आहे. त्यांना मनपाने वसुलीच्या नोटीस बजाविल्या होत्या. गाळेधारकांना पैसे भरण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपलेली असून सोमवारपासून धडक कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईच्या भीतीपोटी काही गाळेधारकांनी शनिवारीच थकबाकी भरली आहे.
महापालीकेच्या मालकीच्या १८ व्यापारी संकुलातील २३८७ गाळ्यांच्या भाडे कराराची मुदत सन २०१२ मध्ये संपुष्टात आली आहे. सन २०१२ पासून गाळेधारकांनी नुकसान भरपाई न भरल्यामुळे कोट्यावधींची थकबाकी गाळेधाकांवर थकीत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून वसुलीसाठी कलम ८१ क ची नोटीस गाळेधारकांना बजाविण्यात आली आहे. दि.११ ऑक्टोबरपर्यंत पैसे भरण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती. ही मुदत शुक्रवारी संपुष्टात आली असून शनिवार व रविवार रोजी सुटी आल्यामुळे सोमवारी मनपा प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे गाळेधारकांना शनिवार व रविवार दोन दिवसांची पुन्हा मुदत मिळाली आहे. या संधीमुळे शनिवारी ६१ व्यापाऱ्यांनी आपल्यावरील थकबाकीचे ४ कोटी ६३ लाख रुपयांचे धनादेश मनपाला देऊन बोझा निल करण्याची विनंती केली आहे. तसेच उर्वरीत काही गाळेधारक उद्या रविवार रोजी आपले धनादेश जमा करणार असल्याने मनपाचा किरकोळ वसुली विभाग सुरु ठेवण्यात आला आहे. शनिवारपर्यंत एकूण ८० गाळेधारकांनी आपली पूर्ण थकबाकी भरल्याने ते थकबाकीदार राहिलेले नाहीत. तर वारंवार नोटीस देऊन इशारा देवून देखील काही गाळेधारकांकडून थकबाकी भरण्यात आलेली नाही. त्यामुळे अश्या व्यापाऱ्यांवर सोमवारपासून कारवाई करण्यात येणार आहे.