जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अत्यंत गजबजलेल्या आकाशवाणी चौक परिसरात रविवारी, ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी एका किरकोळ वादावरून मोठा राडा झाल्याची घटना घडली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोन तरुणांनी एका कारचालकाशी वाद घातल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. हा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या शहर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याला या तरुणांनी धक्काबुक्की केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आकाशवाणी चौकातील दत्त मंदिराजवळ दोन तरुण आणि एका कारचालकामध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. या वादामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि वाद सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र, हे दोन्ही तरुण दारूच्या नशेत असल्याने त्यांनी चक्क पोलिसाशीच हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

वाहतूक पोलिसांनी या तरुणांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु नशेत असलेल्या या तरुणांनी पोलिसाची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की केली. या अनपेक्षित प्रकारामुळे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून वाहतूक शाखेच्या इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेले.
या संदर्भात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, “ऑन ड्युटी पोलिसांवर हात टाकणाऱ्या किंवा कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही.” या प्रकरणाचा पुढील तपास जिल्हापेठ पोलीस करत आहेत.



