Home क्राईम दारुड्या मुलाकडून पित्यावर विळ्याने वार; वडील गंभीर जखमी, मुलगा फरार

दारुड्या मुलाकडून पित्यावर विळ्याने वार; वडील गंभीर जखमी, मुलगा फरार


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे कौटुंबिक वादातून दारूच्या नशेत असलेल्या मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांवर लोखंडी विळ्याने वार करून त्यांना पोटात गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी, ५ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास समोर आली आहे. या घटनेनंतर मारेकरी मुलगा फरार झाला असून, जखमी झालेल्या वडिलांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदसर येथे छगन यादव कोळी (वय ६०) हे आपला मुलगा समाधान छगन कोळी आणि कुटुंबासह राहतात. मुलगा समाधान कोळी याचा घरात नेहमी कौटुंबिक कारणांवरून वाद होत असे. मंगळवारी रात्री १०.३० वाजता समाधान कोळी दारू पिऊन घरी आला. त्यावेळी त्याचे वडील छगन कोळी यांच्याशी पुन्हा वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि संतापाच्या भरात मुलगा समाधान कोळी याने वडील छगन कोळी यांच्या पोटावर लोखंडी विळ्याने वार केले, ज्यात ते गंभीर जखमी झाले.

ही घटना घडल्यानंतर लगेचच समाधान गावातून फरार झाला. जखमी छगन कोळी यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत नोंद करण्यात आलेली नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.


Protected Content

Play sound