Home क्राईम  मद्यधुंद दुचाकीस्वारांमुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

 मद्यधुंद दुचाकीस्वारांमुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

0
207


मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  मुक्ताईनगर शहरात अवैध दारू विक्रीचा विळखा वाढत चालला असून, त्यामुळे मद्यधुंद वाहनचालकांची संख्या वाढल्याने पादचाऱ्यांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नुकत्याच झालेल्या एका भीषण अपघाताने ही समस्या आणखी तीव्र झाली असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

घटनेनुसार, काही दिवसांपूर्वी संध्याकाळच्या सुमारास मुक्ताईनगरमधील बोदवड रोडवरील मुक्ताई चौकात दररोजप्रमाणे वॉकसाठी गेलेल्या एका दाम्पत्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. या अपघातात पती गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, तो सध्या कोमात असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

अपघाताची साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अंदाजे ४० ते ४५ वयोगटातील असून तो अत्यंत मद्यधुंद अवस्थेत होता. अपघात घडल्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला. वाहन चालवताना कोणतेही वाहतूक नियम न पाळता त्याने पादचार्‍यांवर थेट वाहन चढवले, हे विशेष लक्षवेधी आहे.

या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, बोदवड रोडपासून भुसावळ रोडपर्यंत आणि मुक्ताई चौक परिसरात अनेक ठिकाणी टपऱ्या, लहान हॉटेल्स व आडवळणाच्या जागांमध्ये देशी दारू, हातभट्टी व इतर अवैध दारू खुलेआम विकली जात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे रस्त्यांवर मद्यधुंद चालकांची संख्या वाढत असून, सर्वसामान्य नागरिक आणि पादचार्‍यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.

या अपघातानंतर पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई अद्याप केल्याचे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता असून, प्रशासन आणि पोलिस विभागाने तातडीने लक्ष घालून अवैध दारू विक्रीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा, अशा घटना पुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Protected Content

Play sound