एरंडोल, प्रतिनिधी | तालुक्यातील शेतक-यांना दुष्काळी मदत व बोंडअळीची मदत मिळण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. विधासभेतही या संदर्भात आवाज उठवला आहे, त्यामुळेच २२ कोटी रुपयांचे दुष्काळी अनुदान सरकारने मंजूर केले आहे, अशी माहिरी आमदार डॉ.सतिश पाटील यांनी आज (दि.२९) दिली.
मागील वर्षी राज्यात सर्वत्र दुष्काळ पडला होता. शासनाने जिल्ह्यातील ११ तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त म्हणून केला होता. मात्र एरंडोल व पारोळा ही दोन तालुके दुष्काळग्रस्तांच्या यादीतून केवळ राजकीय द्वेषातून वगळण्यात आले होते. त्यामुळे पक्षाच्या माध्यमातून जनआंदोलन केले, तसेच विधानसभेतही आवाज उठवला होता. त्यानंतर दुस-या टप्प्यात पारोळा व शेवटच्या टप्प्यात एरंडोल तालुक्याचा दुष्काळग्रस्त म्हणून शासनाने समावेश केला आहे. विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळे शासनाने दोन्ही तालुक्यांवर अन्याय केला आहे. मात्र मी शासनाशी संघर्ष करून दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यास भाग पाडले आहे. शासनाने दुष्काळी अनुदान म्हणून तालुक्यातील सुमारे ३६ हजार शेतक-यांसाठी २२ कोटी रुपयांचे दुष्काळी अनुदान मंजूर केले आहे, मात्र हे अनुदान अद्यापपर्यंत प्राप्त झालेले नाही. शासन तालुक्यातील शेतक-यांवर अन्याय करीत असुन सदरचे अनुदान शेतक-यांना मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करीत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.