पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण भागातील गुणवत्तेला जिद्द आणि मेहनतीची जोड मिळाली की यश नक्कीच मिळते, हे पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील द्रोणव सुरेंद्र सोनार याने सिद्ध केले आहे. द्रोणवची ‘नॅशनल क्रिकेट लीग’ (NCL) च्या अंडर-१९ संघात निवड झाली असून, यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. फेब्रुवारी महिन्यात दिल्ली येथे होणाऱ्या मानाच्या ‘एनसीएल ट्रॉफी’ स्पर्धेत तो आता महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

निवड शिबिरात अष्टपैलू खेळीचा ठसा :
गोवा येथे नुकतेच राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे निवड शिबिर पार पडले. या कॅम्पमध्ये देशभरातील शेकडो प्रतिभावान खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या अत्यंत चुरशीच्या निवड प्रक्रियेत द्रोणवने आपल्या दमदार फलंदाजीने, अचूक गोलंदाजीने आणि चपळ क्षेत्ररक्षणाने निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. खेळातील शिस्त, आत्मविश्वास आणि उत्कृष्ट संघभावना या गुणांच्या जोरावर त्याची राष्ट्रीय स्तरावरील या लीगसाठी निवड करण्यात आली आहे.

माजी सैनिकाच्या मुलाची गरुडझेप :
द्रोणव हा तामसवाडी येथील रहिवासी आणि सेवानिवृत्त सैनिक सुरेंद्र गणेश सोनार यांचा मुलगा, तर मीराताई सोनार यांचा नातू आहे. एका माजी सैनिकाच्या शिस्तबद्ध वातावरणात वाढलेल्या द्रोणवने आपल्या कौशल्याच्या जोरावर ग्रामीण भागातून थेट राष्ट्रीय स्तरावर झेप घेतल्याने संपूर्ण गावाची मान अभिमानाने उंचावली आहे.
सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव :
द्रोणवच्या या यशाबद्दल माजी पालकमंत्री डॉ. सतीशराव पाटील, माजी नगराध्यक्ष करण पवार, माजी सरपंच हिरामण पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य रोहन पवार आणि विकासोचे माजी चेअरमन प्रमोद पवार यांच्यासह ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन केले आहे. दिल्लीतील मैदानातही द्रोणव अशीच चमकदार कामगिरी करून तालुक्याचा नावलौकिक वाढवेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला असून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



