सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील गुली लोहारा गावाजवळ घडलेल्या एक धक्कादायक अपघाताने परिसरात खळबळ उडवली आहे. भरधाव वेगात असलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या युवकाला धडक दिली आणि कोणतीही मदत न करता चालक घटनास्थळावरून पसार झाला. जखमी युवकावर उपचार सुरू असून पोलिसांकडून चालकाचा शोध घेण्यात येत आहे.
सावदा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, ईतबार मोहम्मद तडवी (वय 28), व्यवसायाने मजूर, रा. गुली लोहारा ता. रावेर, हे रविवार, 20 जुलै रोजी सकाळी सुमारे 10.30 वाजता आपल्या घराजवळील रस्त्यावर मुलांना पाहण्यासाठी गेले होते. याच दरम्यान कुसुंबा गावाच्या दिशेने भरधाव वेगात येणारी पांढऱ्या रंगाची कार (क्रमांक HR/13 E 6516) त्यांच्यावर आदळली. या धडकेत ईतबार तडवी यांना गंभीर दुखापत झाली. विशेष म्हणजे, कारचालक अपघातानंतर थांबून मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून थेट फरार झाला.

या प्रकरणी सावदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 183/2025 अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम 281, 125 (A) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 व 134 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पुंडलिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून कारचा चालक कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी तपास सुरू आहे.
सद्यस्थितीत घटनास्थळी शांतता असून परिसरातील नागरिकांत मात्र भीतीचं वातावरण पसरले आहे. अशा घटनांमुळे वाहतुकीतील बेशिस्तपणा आणि चालकांचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.



