Home Cities मुक्ताईनगर संत मुक्ताई शासकीय कृषी महाविद्यालयास डॉ. विलास खर्चे यांची भेट 

संत मुक्ताई शासकीय कृषी महाविद्यालयास डॉ. विलास खर्चे यांची भेट 


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे सन्माननीय कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी संत मुक्ताई शासकीय कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर येथे सदिच्छा भेटीला हजेरी लावली. या भेटीदरम्यान महाविद्यालयाच्या शैक्षणिक, संशोधन आणि विस्तार कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला आणि पुढील विकासासाठी मार्गदर्शन केले गेले.

महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप पाटील यांनी कुलगुरूंचे शाल, श्रीफळ, मुक्ताई देवीची प्रतिमा, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला. त्यानंतर महाविद्यालयातील अध्यापन पद्धती, शैक्षणिक गुणवत्ता, सुरु असलेले उपक्रम, विद्यार्थी सहभाग तसेच भविष्यातील विकासात्मक आराखडा याची माहिती डॉ. पाटील यांनी सादर केली.

भेटीदरम्यान डॉ. विलास खर्चे यांनी प्राध्यापक, अधिकारी व कर्मचार्‍यांशी संवाद साधला आणि महाविद्यालयाच्या दैनंदिन कामकाजातील प्रशासकीय व शैक्षणिक अडचणींचा आढावा घेत आवश्यक मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त आणि समर्पण यांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच संशोधन, उद्योजकता आणि विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून कृषी क्षेत्राच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले.

मार्गदर्शनपर भाषणात, अत्यल्प मनुष्यबळ असूनही महाविद्यालयात सुरु असलेल्या गुणवत्तापूर्ण कार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) चे मानांकन मिळवण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले. गुणवत्तावाढ, नवोन्मेषी अध्यापन पद्धती, डिजिटल साधनांचा प्रभावी वापर आणि संशोधनाभिमुख दृष्टिकोन यावर भर देण्याचे त्यांनी आवाहन केले.

यानंतर कुलगुरूंनी महाविद्यालय प्रक्षेत्र, प्रयोगशाळा, अनुभवाधिष्ठित शिक्षण प्रात्यक्षिके, ग्रंथालय, वसतिगृहे तसेच गांडूळ खत (वर्मी कंपोस्ट) युनिटची पाहणी केली. त्यांच्या शुभहस्ते सातपुडा जातीच्या कुक्कुटपालन युनिटचे उद्घाटन देखील करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे.

कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. सागर पाटील यांनी केले.


Protected Content

Play sound