Home आरोग्य डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या भव्य रक्तदान शिबिर

डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या भव्य रक्तदान शिबिर


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सामाजिक बांधिलकीची जाणीव जपत आणि “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश समाजापर्यंत पोहोचवत जळगावातील गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे 23 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात येत असून विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी तसेच सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

सोमवार, दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 8.00 ते दुपारी 2.00 या वेळेत महाविद्यालयाच्या परिसरात हे शिबिर पार पडणार आहे. या उपक्रमासाठी डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल ब्लड बँक यांचे विशेष सहकार्य लाभले असून रक्तसंकलनासाठी तज्ज्ञ वैद्यकीय पथक उपस्थित राहणार आहे. शिबिरादरम्यान रक्तदात्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून सुरक्षित पद्धतीने रक्तसंकलन केले जाणार आहे.

डॉ. उल्हास पाटील सर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्याच परंपरेतून यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, समाजातील रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया रुग्ण, तसेच विविध गंभीर आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी रक्ताची नितांत गरज भासते. या पार्श्वभूमीवर युवकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करणे ही काळाची गरज असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले.

महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह जळगाव शहरातील नागरिकांनीही या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. रक्तदानासाठी इच्छुकांनी अधिक माहितीसाठी प्रा. व्ही. एम. होले (मो. 9422872747) तसेच रक्तपेढी समन्वयक लक्ष्मण पाटील (मो. 9326150006) यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.


Protected Content

Play sound