जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ‘आरोग्यसेवेत लिंग समानता’ या विषयावर ८ मार्च रोजी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अंतर्गत गुणवत्ता हमी समिती (IQAC) आणि गोदावरी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत तज्ज्ञ डॉक्टर आरोग्यसेवेतील लिंगभेद नष्ट करण्यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन करणार आहेत.
महिला आरोग्य, कायदा आणि आधुनिक उपचारांवर चर्चासत्रे
कार्यशाळेची सुरुवात सकाळी ९ वाजता होणार असून, डॉ. एन. एस. आर्विकर ‘महिला सक्षमीकरण: कायदेशीर आणि इतर पैलू’ या विषयावर माहिती देतील. डॉ. योगिता बावस्कर ‘जीवनशैली आणि औषधोपचार’, तर डॉ. गजानन पाटील ‘लॅप्रोस्कोपीद्वारे महिलांच्या आरोग्याची प्रगती’ यावर मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. सचिन सोलंके ‘आरोग्य सेवेतील लिंगभेद – एक डॉक्टरचा दृष्टिकोन’ मांडणार असून, स्त्रीरोग शस्त्रक्रियेत झालेल्या नवीन संशोधनांबद्दल माहिती दिली जाईल.
महिलांच्या आरोग्य समस्या आणि उपाययोजना
दुपारच्या सत्रात डॉ. सी. ए. कांते ‘सावलीपासून प्रकाशझोतात – महिलांचे संघर्ष आणि यश’, तसेच डॉ. सी. डी. सारंग ‘सामान्य महिला आरोग्य समस्या’ या विषयांवर चर्चा करतील. कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रात डॉ. माया आर्विकर ‘महिलेचे आरोग्य: एक आढावा’ या महत्त्वपूर्ण विषयावर भाष्य करणार आहेत.
संपर्क आणि विशेष प्रोत्साहन
सायंकाळी ५ वाजता कार्यशाळेचा समारोप करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे २ क्रेडिट पॉइंट्स मिळणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त तज्ज्ञांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.