Home आरोग्य डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील वृद्ध महिलेवर संपूर्ण गुडघा प्रत्यारोपण यशस्वी

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील वृद्ध महिलेवर संपूर्ण गुडघा प्रत्यारोपण यशस्वी


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वाढत्या वयात गुडघेदुखीमुळे हालअपेष्टा सहन करणाऱ्या ७८ वर्षीय महिलेच्या आयुष्यात नव्या आशेचा किरण उजळला आहे. अकोला जिल्ह्यातील शिरसोली येथील मनुताई गिर्‍हे (वय ७८) यांच्यावर जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालय येथे संपूर्ण गुडघा प्रत्यारोपण (टोटल नी रिप्लेसमेंट) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.

गेल्या पाच ते सहा वर्षांपासून त्या तीव्र गुडघेदुखीने त्रस्त होत्या. सुरुवातीला घरगुती उपाय, वेदनाशामक औषधे आणि स्थानिक उपचार करून पाहण्यात आले; मात्र झिजलेले गुडघे, संधीवातामुळे ठिसूळ झालेली हाडे आणि वाढते वय यामुळे चालणे अत्यंत कठीण झाले होते. दैनंदिन कामकाज तर दूरच, घरातील साधी हालचालही वेदनादायी ठरत होती.

योग्य उपचारांच्या शोधात कुटुंबीयांनी नागपूर व संभाजीनगर येथील नामांकित रुग्णालयांतही सल्लामसलत केली. मात्र वयोमान लक्षात घेता शस्त्रक्रियेची जोखीम सांगत काही ठिकाणी ती टाळण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे उपचाराचा प्रश्न प्रलंबितच राहिला.

अखेर जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालय येथे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. दीपक अग्रवाल यांनी रुग्णाची सखोल तपासणी केली. एक्स-रे व इतर वैद्यकीय चाचण्यांनंतर गुडघ्यांमध्ये तीव्र ऑस्टिओआर्थरायटिस असल्याचे निदान झाले. औषधोपचार निष्फळ ठरत असल्याने संपूर्ण गुडघा प्रत्यारोपण हाच प्रभावी पर्याय असल्याचा निर्णय घेण्यात आला.

वयोमानामुळे ही शस्त्रक्रिया आव्हानात्मक होती. तरीही डॉ. दीपक अग्रवाल यांनी आपल्या अनुभव व आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. या वेळी डॉ. वेदांत पाटील, डॉ. सुमित भोसले व रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

शस्त्रक्रियेनंतर अवघ्या काही दिवसांत रुग्णाच्या वेदनांमध्ये मोठी घट झाली आहे. फिजिओथेरपीच्या मदतीने त्या हळूहळू चालण्यास सक्षम होत असून, कुटुंबीयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

या शस्त्रक्रियेसाठी साधारण दोन ते अडीच लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र रुग्णालयात उपलब्ध महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली. त्यामुळे आर्थिक दिलासाही मिळाला.


Protected Content

Play sound