जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अँटीबायोटिक्स अर्थात प्रतिजैविक औषधांचा अवाजवी आणि चुकीच्या पद्धतीने होणारा वापर थांबवण्यासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात प्रतिजैविक प्रतिरोधक जागरूकता सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. यावेळी तज्ज्ञांनी प्रतिजैविक औषधांचा वापर डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसारच करण्याचे आवाहन केले.

मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. कैलास वाघ यांनी अँटीबायोटिक्स वापरात आवश्यक ती काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की प्रतिजैविक औषधे कधीही स्वखुशीने घेऊ नयेत तर वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच त्यांचे सेवन करावे. उपचारादरम्यान औषधांचा कोर्स अर्धवट सोडणे हा मोठा धोका ठरू शकतो. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेला कोर्स पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. तसेच चिकित्सकांनीही रुग्णाला गरजेनुसार आणि मर्यादित प्रमाणातच प्रतिजैविक औषधे द्यावीत, असे ते म्हणाले.

प्रतिजैविक प्रतिरोधकता ही आजच्या काळातील एक गंभीर आरोग्य समस्या बनत चालली असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित, मेंदू व मणका शल्यचिकित्सक डॉ. विपूल राठोड, डॉ. सुभाष बडगुजर, डॉ. चंदन साबळे, डॉ. अब्दुल्लाह, परिचारीका विभागाचे प्रमुख संकेत संकपाळ, प्रशासन अधिकारी अशोक भिडे, अशोक बर्हाटे यांच्यासह रुग्ण आणि वैद्यकीय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान डॉ. कैलास वाघ यांनी पोस्टरच्या माध्यमातून अँटीबायोटिक्स म्हणजे काय, त्यांचा वापर कधी आणि कसा करावा, चुकीच्या वापराचे दुष्परिणाम काय होऊ शकतात याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. संपूर्ण आठवडाभर विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये, रुग्णांमध्ये आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार असून प्रतिजैविक प्रतिरोधकतेबाबत जागरूकता वाढवण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.



