जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अत्यंत गंभीर परिस्थितीत डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल झालेल्या भुसावळ येथील गर्भवती महिलेला तातडीच्या सिझेरियन आणि ऑब्स्टेट्रिक हिस्टेक्टोमीद्वारे यशस्वीरीत्या जीवदान देण्यात आले. रुग्णालयातील अनुभवी स्त्रीरोग तज्ञ, आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि जलद निर्णयक्षमता यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे जटिल प्रकरण हाताळण्यात यश आले.

भुसावळ येथील संगीताकुमारी या गर्भवती महिलेची यापूर्वी दोन वेळा सिझेरियन प्रसूती झाल्यामुळे तिची जोखीम श्रेणी आधीपासूनच वाढलेली होती. या गर्भधारणेत तर गंभीर गुंतागुंत निर्माण झाली होती. या अवस्थेमुळे प्रसूतीदरम्यान अत्याधिक रक्तस्त्राव होण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता.

रुग्णालयात दाखल होताच तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे स्पष्ट झाले. रक्तदाब कमी, हार्ट रेट १४० पेक्षा जास्त, तीव्र वेदना आणि अस्वस्थता अशी तातडीची स्थिती होती. वेळ न दवडता स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वैभव पाटील, डॉ. मृदूला मुंगसे, डॉ. रश्मी संघवी, डॉ. ऐश्वर्या चलवदे आणि डॉ. पल्लवी शेंडगे यांच्या टीमने तात्काळ सिझेरियन सुरू केले.
शस्त्रक्रियेदरम्यान गर्भाशयाभोवती झालेल्या गाठी आणि प्लासेंटा चुकीच्या ठिकाणी असल्याने सतत रक्तस्त्राव वाढत होता. स्थिती हाताबाहेर जाण्याच्या मार्गावर असताना एकमेव सुरक्षित पर्याय म्हणून ऑब्स्टेट्रिक हिस्टेक्टोमी—गर्भाशय काढण्याची अत्यंत जोखमीची शस्त्रक्रिया—करावी लागली. वेळेशी स्पर्धा करणारी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया डॉक्टर्सनी यशस्वीरीत्या पार पाडली.
शस्त्रक्रियेनंतर रूग्णाला तात्काळ आयसीयूमध्ये हलवण्यात आले. येथे मेडीसीन विभाग प्रमुख डॉ. चंद्रय्या कांते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रिषभ पाटील आणि डॉ. हर्ष मेहता यांनी सतत देखरेख ठेवत उपचार दिले. सध्या तिची प्रकृती स्थिर असून पुढील निरीक्षण सुरू आहे.
या प्रकरणातून पुन्हा एकदा डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील अत्याधुनिक प्रसूती सुविधा, कुशल डॉक्टर्सची तत्परता आणि उत्कृष्ट टीमवर्क सिद्ध झाले आहे. योग्य वेळी घेतलेले निर्णय आणि आधुनिक वैद्यकीय सहाय्य यामुळे एका मातेस नवजीवन मिळाले आहे.



