डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात ‘डिव्हाइस क्लोजर’ शस्त्रक्रियेचे यश

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हृदयाशी संबंधित एक अत्यंत किचकट व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. ‘डिव्हाइस क्लोजर’ या अत्याधुनिक तंत्राच्या सहाय्याने सात महिन्यांचा बालक व चार वर्षांचा दुसरा बालक यांच्यावर यशस्वी हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे दोन्ही बालकांना नवजीवन मिळाले असून, सध्या ते पूर्णतः ठणठणीत आहेत.

धरणगाव येथील देवांश निकम (४ वर्षे) आणि यावल येथील मुजामिल शेख (७ महिने) या बालकांना जन्मतःच हृदयात छिद्र होते. त्यामुळे त्यांना सतत धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या त्रासदायक लक्षणांचा सामना करावा लागत होता. बालरुग्णांची प्रकृती लक्षात घेता त्यांना डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात करण्यात आलेल्या ‘२ डि इको’ तपासणीत हृदयातील छिद्र स्पष्ट झाल्यानंतर त्वरीत उपचाराची आवश्यकता लक्षात घेऊन, विभागप्रमुख डॉ. वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथील बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. श्रीपाल जैन यांच्या नेतृत्वात रुग्णालयाच्या हृदयालय टीमने डिव्हाइस क्लोजर शस्त्रक्रिया पार पाडली. शस्त्रक्रियेसाठी तज्ञ डॉक्टर धवलकुमार, डॉ. ललितकुमार, तंत्रज्ञ सुधाकर बिराजदार व नर्सिंग विभागाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ही एक आधुनिक व कमी आक्रमक प्रक्रिया असून, यात उघड्या हृदयाची शस्त्रक्रिया टाळता येते. शिरामार्गे एक खास उपकरण हृदयात पोहोचवून छिद्र बंद केले जाते. त्यामुळे रुग्णाचा त्रास कमी होतो व लवकर बरे होण्यास मदत होते. या शस्त्रक्रियेचा खर्च मोठा असला तरी दोन्ही बालकांच्या कुटुंबांची आर्थिक स्थिती दुर्बल असल्याने त्यांना ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’अंतर्गत मोफत उपचार मिळाले.

डॉ. वैभव पाटील यांची प्रतिक्रिया : “ग्रामीण व उपनगरातील रुग्णांनाही अत्याधुनिक उपचार मिळावेत, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ही शस्त्रक्रिया हे याचे उत्तम उदाहरण आहे. दोन्ही बालकांचे जीवन वाचवता आल्याचा आम्हाला खूप आनंद आहे. या यशामुळे पालकांच्या चेहर्‍यावर आनंदाचे अश्रू उमटले.”

Protected Content