मुंबई (वृत्तसंस्था) डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. दोन लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची जामीनावर सुटका केलीय. परंतू आरोपींना मुंबईबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
या संदर्भात अधिक असे की, संशयित आरोपी डॉ. हेमा आहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. भक्ती मेहेर या तिघंही जणी किरकोळ कारणावरून सातत्याने डॉ. पायल तडवी यांना जातिवाचक शब्द वापरून अपमानित करत असत. डॉ. पायल तडवीने जातिवाचक छळा कंटाळून आत्महत्या केली होती. याप्रकरणी आरोपींचा जामीन अनेकवेळा नामंजूर झाला होता. परंतू आरोपींना हायकोर्टाकडून अखेर आज जामीन मंजूर झाला. 2 लाखांच्या जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली आहे. परंतू न्यायालयाने आरोपींना मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. तसेच एक दिवस आड तपासयंत्रणेपुढे हजेरी लावणं अनिवार्य असल्याचे सांगितले आहे. एवढेच नव्हे तर, तिघंही आरोपीं डॉक्टरांना नायर रूग्णालय आणि आग्रीपाडा परिसरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच तिन्ही महिला डॉक्टरांचे वैद्यकिय परवाने खटला संपेपर्यंत स्थगित राहतील. जातीवरून एखाद्याला कमी लेखणाऱ्या अश्या प्रवृत्तीच्या लोकांना जन्माची अद्दल घडायला हवी,असेही हायकोर्टाने आज म्हटले. यावेळी विशेष सरकारी वकिलांनी डॉ. पायल तडवी प्रकरणातील आरोपींना सशर्त जामीन देण्यास आमचा विरोध नसल्याचे म्हटले.