मुंबई-वृत्तसेवा । भाजप नेत्यांविरोधात आक्षेपार्ह आणि कथित खोटी माहिती असलेली पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले ब्रिटनस्थित भारतीय वंशाचे डॉक्टर संग्राम पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई पोलिसांनी त्यांच्या विरोधात जारी केलेल्या लुक आउट सर्क्युलरला (एलओसी) त्यांनी आव्हान दिले असून, या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डॉक्टर संग्राम पाटील हे मूळचे जळगावचे असून सध्या ब्रिटनमध्ये स्थायिक आहेत. 10 जानेवारी रोजी ते कुटुंबासह भारतात आले असता मुंबई विमानतळावर मुंबई पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दिवसभर चाललेल्या चौकशीनंतर सायंकाळी उशिरा त्यांची सुटका करण्यात आली. भाजप सरकारविरोधातील टीकेसाठी ओळख असलेल्या पाटील यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई झाल्याचा आरोप होत असल्याने या घटनेचे सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटले होते.

दरम्यान, 19 जानेवारी रोजी पाटील कुटुंबासह लंडनकडे रवाना होणार होते. मात्र, मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या लुक आउट सर्क्युलरमुळे त्यांना परदेश प्रवास करता आला नाही. त्यानंतर बुधवारी ते चौकशीसाठी दिवसभर मुंबई पोलिसांसमोर उपस्थित राहिले. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवल्यानंतर, त्यांच्या वकिलांमार्फत त्यांनी एलओसीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
डॉक्टर संग्राम पाटील यांच्याविरोधात समुदायांमध्ये वैर आणि द्वेषाची भावना निर्माण करणारी खोटी माहिती पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम 353(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कलमानुसार कमाल तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.
भाजपच्या समाजमाध्यम खात्यांची जबाबदारी सांभाळणारे निखिल भामरे यांनी एन. एम. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, 18 डिसेंबर रोजी ‘शहर विकास आघाडी’ या फेसबुक पेजवर 14 डिसेंबरला प्रकाशित झालेल्या एका पोस्टमध्ये भाजप व तिच्या प्रमुख नेत्यांविषयी आक्षेपार्ह व चुकीची माहिती देण्यात आली होती. ही माहिती पसरवण्याच्या उद्देशानेच पाटील यांनी ती पोस्ट पुढे शेअर केल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयात आज होणारी सुनावणी आणि त्यातून निघणारा निर्णय या प्रकरणाला कोणती दिशा देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



