यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्रशासनिक पातळीवर महत्त्वपूर्ण बदल घडला असून डॉ. एस. आर. गायकवाड यांनी प्रभारी प्राचार्य पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. गेल्या सहा वर्षांपासून प्रभारी प्राचार्य म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रा. संध्या सोनवणे यांची चोपडा महाविद्यालयात कायमस्वरूपी नियुक्ती झाल्यानंतर हा बदल करण्यात आला आहे.
ज.जि.म.वि. प्र. सहकारी संस्थेद्वारे संचलित असलेल्या या महाविद्यालयात आज झालेल्या कार्यक्रमात डॉ. गायकवाड यांना प्रभारी प्राचार्य पदाची सूत्रे देण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतात त्यांनी महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी नवे उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी स्पष्ट केला.

प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही नव्या नेतृत्वाला पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही दिली. डॉ. गायकवाड यांच्या नियुक्तीमुळे महाविद्यालयाच्या प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. संस्थेच्या अपेक्षांनुसार शैक्षणिक, सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रात महाविद्यालय अधिक सक्षम होईल, अशी आशा व्यक्त झाली.
या स्वागत समारंभाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. बी. सी. पाटील यांनी केले. कार्यक्रमास डॉ. प्रा. आर. डी. पवार, प्रा. डॉ. पी. व्ही. पावरा, प्राध्यापिका सोनाली पाटील, वरिष्ठ लिपिक मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर, प्रमोद भोईटे, भाऊसाहेब चौधरी, प्रमोद कदम, प्रा. संतोष जाधव, प्रा. नरेंद्र पाटील, प्रा. नागेश्वर जगताप, प्रा. सी. टी. वसावे, प्रा. ईश्वर पाटील तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



